खास स्वागतकरण्याचा शिवसेनेचा इशारा

विरोधकांच्या संघर्ष यात्रेला चोख उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या शेतकरी शिवार संवाद यात्रेची सुरूवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरूवारपासून नंदुरबार जिल्ह्य़ातून करणार आहेत. दानवे यांनी अलीकडेच शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने दानवे ‘दाजीं’चे स्वागत खास आपल्या पध्दतीने करण्याचा इशारा दिला असून, भाजपमधील अंतर्गत वादही पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत. शहाद्याच्या आमदारांनी पत्रक काढून दानवे हे ब्राम्हणपुरीचा तर जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. हिना गावितांनी पत्रकार परिषद घेत दानवे नांदरखेडय़ाचा दौरा करणार असल्याचे सांगितले. यामुळे कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे.

काँग्रेस-राष्टवादीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष यात्रा काढल्यानंतर यात्रेला सत्ताधाऱ्यांकडून चोख उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी शिवार संवाद यात्रेची घोषणा केली होती. या यात्रेची सुरूवात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नंदुरबारमधून करणार आहेत. या यात्रेसाठी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंसोबत दानवे नंदुरबार मुक्कामी असून गुरूवारी शहादा तालुक्यातील नादरखेडा गावातील शेतकऱ्यांच्या शेती शिवारात जाऊन ते चर्चा करणार आहेत. यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून नंदुरबारमधील शिवाजी नाटय़ मंदिरात सभेचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती भाजपच्या जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपमधील अंतर्गत वादही उफाळले आहेत. शहाद्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी एक पत्रक काढून दानवे हे तालुक्यातील ब्राम्हणपुरी गावात शेतकरी शिवार संवाद सभा घेणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी ब्राम्हणपुरी परिसरातील शेतकऱ्यांना गावात जमण्याचेही आवाहन केले आहे. मात्र दानवे यांचा ब्राम्हणपुरी परिसरासाठी असा कुठलाही दौरा आपल्याला प्राप्त झाला नसल्याचे जिल्हाध्यक्ष हिना गावितांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही दानवेंच्या कार्यक्रमाला विरोध करण्याची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी दिली आहे.