टाटा समुहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी नागपूरमधील संघ मुख्यालयाला भेट दिली. रतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. या भेटीत रतन टाटा आणि मोहन भागवत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

बुधवारी दुपारी रतन टाटा आणि भाजप नेत्या शायना एनसी नागपूरमध्ये दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी रेशमबागमधील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. यानंतर ते दोघेही संघ मुख्यालयात दाखल झाले.  संघ मुख्यालयात रतन टाटा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा केली. टाटा समुहातील वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. देशातील मोठ्या उद्योगपतींनी संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे आली आहेत. सायसर मिस्त्री आणि नस्ली वाडिया या दोघांनीही टाटा समुहाविरोधात याचिका दाखल केली आहे. टाटा ट्रस्टने अध्यक्षांच्या निवडीसाठी खासगी सल्लागार नेमला असून, पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.
टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संवेदनशील आणि गोपनीय दस्तावेज उघड केल्याचा आरोप मिस्त्री यांच्यावर केला आहे. सायरस मिस्त्रींना टाटा सन्समधून नारळ दिल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर रतन टाटा आणि सायरस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.