सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य दुकानदारांसाठी हमालमुक्त द्वारपोच योजना सुरू करावी, किरकोळ रॉकेल विक्रेत्यांसाठी एक रुपया कमिशन द्यावे व मार्जीन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील अडीच हजार स्वस्त धान्य दुकानदार, तसेच दोन हजार हॉकर्स विक्रेत्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. १ जुलपासून संप सुरू केल्याने ऐन रमजान व इतर सणाच्या दिवसांत नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, हॉकर्स यांनी १ जुलपासून बेमुदत संप पुकारल्याने धान्यासह रॉकेल वितरण थंडावले आहे. केरोसीनमध्ये हॉकर्स व किरकोळ परवानाधारकांना लिटरमागे साडेबावीस पसे कमिशन मिळते. ते एक रुपया करावे. हमालीमुक्त द्वारपोच योजना, धान्य वितरण करताना येणारी तूट ग्राह्य धरुन वाढीव माल द्यावा, मार्जीन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, महाराष्ट्र अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारकांना शासकीय वेतन द्यावे, दुकानांमध्ये परवानाधारक व्यक्तीची मदतनीस म्हणून नियुक्ती करावी, घरगुती गॅसधारकांना पाच किलो सिलेंडर वितरणाचे काम दुकानदारांमार्फत करावे, परवानाधारकांच्या हातून किरकोळ चुकांबाबत मोक्का कायद्यांतर्गत होणारी कारवाई रद्द करावी, एपीएल कार्डधारकांना दरमहा धान्य उपलब्ध करावे, सरकारकडे दुकानदारांची थकीत रक्कम तत्काळ अदा करावी, अशा १५ मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार, हॉकर्सनी संप पुकारला आहे. चार दिवसांपासून हा संप सुरू असल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरण पूर्णपणे थांबले आहे. काही दिवसांवर रमजान ईदसह इतर सण आले असताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दुकानदारांनी संप पुकारल्याने जनतेची परवड होणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष के. के. खान यांनी मंगळवारी (दि. ७) मुंबईत होणाऱ्या बठकीत तोडगा न निघाल्यास संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.