रत्नागिरी जिल्ह्य़ातील निसर्गवैभव, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे पर्यटकांना पहाता यावेत, जिल्ह्य़ातील गड किल्ले, मंदिराचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना कळावा, इथल्या सण, उत्सव, परंपरा, कला, संस्कृती, खाद्यपदार्थाच्या माध्यमातून समृद्ध कोकणी लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, यासाठी यंदा चिपळूण येथे तीन दिवस रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६चे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ९ मे या कालावधीत चिपळूण येथील पवन तलाव मैदान हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकारामबुवा गोलमडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून, यावेळी खा. हुसेनभाई दलवाई, खा. विनायक राऊत, आ. अनिल तटकरे, आ. उदय सामंत, आ. राजू साळवी, आ. संजय कदम, आ. हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, पंचायत समिती सभापती स्नेहा मेस्त्री, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रत्नागिरी जिल्ह्य़ातील आमदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, महिला व पुरुष वर्ग मोठय़ा प्रमाणात या महोत्सवाच्या जय्यत तयारीला लागले आहेत. चिपळूण येथील रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदानंद चव्हाण यांची वायकर यांनी नेमणूक केली आहे.
मागच्या वर्षी हा महोत्सव रत्नागिरी येथील भाटे समुद्रकिनारा येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. यंदाही रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच साहसी खेळांचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
महोत्सवात प्राचीन कोकणचा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला असून त्यामध्ये १२ बलुतेदार आपआपली कला व वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. त्याचबरोबर समुद्रामध्ये आढळणाऱ्या विविध माशांच्या जातींचे प्रदर्शनही दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवाची वैशिष्टय़े म्हणजे एरो मॉडेलिंग, अ‍ॅव्हेंचर गेम्समध्ये कयाकिंग, रिव्हर क्रॉसिंग, जेट स्की, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, रॉक क्लायम्बिंग व आर्चरी.
या महोत्सवाला महाराष्ट्राबरोबर अन्य राज्ये तसेच देशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी येणाऱ्यांना आमराई सफारी, क्रोकोडाइल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. आमराई सफारीमध्ये बैलगाडी सफर, हॉर्स रायडिंग, ओपन जीप सफर, बर्ड वॉचिंग, नेचर ट्रेल, अ‍ॅग्रो टुरिझमची माहिती तसेच पर्यटकांना पोटभर आंबे तसेच स्थानिक कोकण मेवा खाण्याचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी जेवणाची व राहाण्यासाठी टेंटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
हवाई फोटोग्राफर स्व. गोपाळ बोधे यांचे प्रदर्शन स्थानिक कलाकारांचे चित्र, शिल्प प्रदर्शन कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
महोत्सवामध्ये नावीन्यपूर्ण योजना म्हणून जलसंवर्धनावर आधारित पाणी वाचवा मोहीम, जंगल संवर्धनावर आधारित जंगल वाचवा मोहीम, स्वच्छता मोहीम, नदीतील गाळ काढण्याची मोहीम या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात महिला बचत गटांकरिता २५ गाळे विनामूल्य देण्यात येणार आहे. कृषी विभागाकरिता २५ गाळे देण्यात येणार असून यात कृषीविषयी संबंधित उत्पादने, अवजारे, बि-बियाणे, खते व कृषी प्रदर्शन व आंबा प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या तीनही दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये एकूण वेगवेगळ्या १९ रोगांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधांचा मोठा पुरवठा करण्यात येणार आहे.
सुरक्षित सागरी पर्यटन, कोकणातील पर्यटनाचे बदलते स्वरूप, कृषी पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, शिवचरित्र व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम
७ मे २०१६- चला हवा येऊ द्या
८ मे २०१६ – स्थानिक लोककला
महाराष्ट्र महोत्सव
९ मे २०१६ – सुदेश भोसले संगीत गौरव