केवळ बातम्या वाचू नका. अग्रलेख, स्तंभ वाचा, मनन करा, त्यामुळेच तुमची दृष्टी तयार होईल. दृष्टिकोन व्यापक बनेल, असा सल्ला माजी पोलीस अधिकारी व समाजसेविका डॉ.किरण बेदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. राणीबाई अग्निहोत्री स्मृतीदिनानिमित्य अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
काही संदर्भ वगळता त्यांच्या विविध दाखल्यांनिशी झालेल्या भाषणास विद्यार्थ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या, आईवडिलांच्या आशीर्वादाने मी मोठी झाले. तुम्हीही आईला विसरू नका. शिक्षण एक आरसा आहे. तुमचा चेहरा त्यात दिसतो. त्यातूनच तुम्हाला वाटही मिळते. मात्र, वहिवाटेने जाऊ नका. स्वत:ची पाऊलवाट तयार करा. मस्तक, ह्रदय व हात (हेड-हर्ट-हॅन्ड) या तीन गोष्टींना शिक्षण भक्कम करते. सध्या अपशब्दांचा बोलबाला दिसून येतो. इतरांचा अपमान करण्याची वृत्ती बळावली आहे. शिक्षित भारतात अशी अशिक्षित वृत्ती दिसून येते, पण योग्यवेळी जो योग्य शब्द वापरतो तो खरा सुशिक्षित होय. शिक्षण हा पुढे जाण्याचा व मोठे होण्याचा परवाना आहे. नोकऱ्यांच्या शोधात भटकू नका, आत्मनिर्भर बना, संशोधन करा, रोजगार निर्माण करा. इतर देश वृध्दापकाळाकडे झुकत आहे, तर भारत उमलत्या तरुणाईचा देश आहे. कष्टाची लाज वाटू देऊ नका. प्रत्येकाने रोज एक तास श्रमदान करावे. ‘स्वच्छ भारत श्रमिक भारत’ हे ध्येय अंमलात आणा. त्यासाठी दृष्टी तयार होणे गरजेचे आहे. केवळ बातम्यांपुरते थांबू नका. आतल्या पानावरील अग्रलेख, स्तंभ वाचा. त्यामुळे स्वत:ची एक दृष्टी तयार होते. व्यक्ती प्रगल्भ होते. केवळ टीव्हीच न बघता रेडिओ ऐका. सरकारच्या योजना तुम्हाला कळतील. त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल. हस्तकौशल्य हाच आज परवलीचा शब्द ठरला आहे. तुमचे आयुष्य वाया जाणार नाही, असा हितोपदेश त्यांनी केला. सध्या तुमच्या महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री लाभला आहे, अशी टिपणी करीत त्यांनी महाराष्ट्र घडविण्यात योगदान देण्याचे आवाहनही केले. संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणातून बेदी यांच्या सल्ल्याचा संदर्भ देत संस्था श्रमदानाशी कटिबध्द असल्याची हमी दिली. गुणगौरव सोहळ्यात विद्यापीठात अव्वल आलेल्या संस्थेच्या विधी, अभियांत्रिकी, फोर्मसी व अन्य शाखेतील गुणवंतांचा बेदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अग्निहोत्री स्पोर्ट अ‍ॅकेडमीचे उद्घाटन बेदी यांच्या हस्ते करण्यात आले.