अहमदनगर (भिंगार) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी अखेर ५४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत ऐनवेळी का होईना भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत युती झाली असली तरी प्रभाग क्रमांक पाचमध्ये दोन्ही पक्षांत अपेक्षेप्रमाणे युती तुटली आहे. येथे दोघांमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितले. शिवाय प्रभाग चारमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश लुणिया यांनी बंडखोरी केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सात जागांसाठी नव्या वर्षांत दि. ११ जानेवारीला पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सात जागांसाठी ७९ इच्छुकांचे ११९ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काळात अनेकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. सोमवारी या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले, त्याबरोबरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग चारमध्ये सर्वाधिक म्हणजे ११ उमेदवार रिंगणात आहेत.
भाजप-शिवसेनेत युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेला ४ (प्रभाग क्रमांक ४, ५, ६ आणि ७) आणि भाजपला ३ (प्रभाग क्रमांक १, २ आणि ३) असे जागावाटप निश्चित झाले. मात्र प्रभाग क्रमांक पाचवर भाजप अडून बसल्याने बराच काळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. अखेर मैत्रिपूर्ण लढतीचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेच्या विद्यमान सदस्य स्मिता दीपक कुंभारे (आष्टेकर) आणि भाजपच्या शुभांगी गणेश साठे या परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरल्या आहेत. या प्रभागात सुशीला आनंदा कापसे (काँग्रेस), माधुरी राजेश काळे (राष्ट्रवादी) आणि रत्ना मुकुंद घुले (अपक्ष) असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तिन्ही प्रमुख पक्ष या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी सर्व जागा लढवत आहेत, तर मनसे पाच जागांवर रिंगणात उतरली आहे.
प्रभागनिहाय उमेदवार
प्रभाग क्रमांक १ (एकूण उमेदवार ५)- मार्गारेट जाधव (काँग्रेस), संगीता नकवाल (अपक्ष), स्वाती पतके (भाजप), मीना मेहतानी (राष्ट्रवादी) आणि सईदा बशीर शेख (अपक्ष). प्रभाग २ (एकूण ६)- मच्छिंद्र ताठे (मनसे), शिवाजी दहिहंडे (अपक्ष), महेश नामदे (भाजप), नामदेव लंगोटे (अपक्ष), शेख सलीम रफिक (राष्ट्रवादी) आणि रिझवान करीम शेख (काँग्रेस). प्रभाग ३ (एकूण ९)- श्रावण काळे (अपक्ष), संदीप काळे (मनसे), रोहित कांबळे (अपक्ष), किरण पानपाटील (भाजप), सुमीत बनसोडे (काँग्रेस), जाकीर बागवान (अपक्ष), शाहीन शकील (अपक्ष), निजाम सय्यद (अपक्ष) आणि मुसद्दिक सय्यद अब्दुल ऊर्फ मुसा सादिक (राष्ट्रवादी). प्रभाग ४ (एकूण ११)- नीता जमधडे (अपक्ष), रवींद्र लालबोंद्रे (शिवसेना), प्रकाश लुणिया (अपक्ष), दीपक वाघस्कर (अपक्ष), श्यामराव वाघस्कर (काँग्रेस), शेख अकील अकबर (अपक्ष), अकील शेख जलील (मनसे), शेख नूर अब्दूल रऊफ (अपक्ष), मुमताज शेख ऊर्फ अनिता दुरळे (अपक्ष), शोएब आयाज शेख (अपक्ष) आणि सय्यद मतीन ख्वाजा (राष्ट्रवादी). प्रभाग ६ (एकूण १०)- सुदाम गांधले (अपक्ष), गणेश तरवडे (अपक्ष), विलास तोडमल (राष्ट्रवादी), बाळासाहेब धाकतोडे (अपक्ष), संतोष धीवर (अपक्ष), पांडुरंग फुलारी (अपक्ष), प्रकाश फुलारी (शिवसेना), रामचंद्र बिडवे (मनसे), सचिन बुक्कन (काँग्रेस) आणि श्यामसुंदर रासकर (अपक्ष). प्रभाग ७ (एकूण ८)- सुदर्शन गोहेर (अपक्ष), संजय छजलानी (शिवसेना), अजिंक्य भिंगारदिवे (राष्ट्रवादी), नीलेश भिंगारदिवे (मनसे), पवन भिंगारदिवे (अपक्ष), विजय भिंगारदिवे (काँग्रेस), रेखा वाघमारे (अपक्ष) आणि प्रदीप वावरे (अपक्ष).