नेपाळमधील महाभूकंपाने भारतातील बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालसह काही प्रदेश हादरून गेले असताना ११ डिसेंबर १९६७ या दिवशी कोयना धरणानजीक झालेल्या भूकंपाची ती काळरात्रही काही क्षणांकरीता जागी झाली. कोयनेचा तो भूमिकंप अनुभवणाऱ्यांना त्या वेळच्या आठवणी आजही ताज्या वाटतात. कृष्णाकाठ सुप्त भीतीच्या खाईत लोटला जातो.
नेपाळमध्ये केंद्र असलेल्या भूकंपाने जबरदस्त धक्का दिला असतानाच काल उत्तररात्री ३ वाजून २ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्का कोयनानगर जवळ बसला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ८.८ किलोमीटरवर होता. कराड येथील भूकंप वेधशाळेत या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असून, त्याचा केंद्रबिंदू कराडपासून ४८ किलोमीटरवर कोयना विभागात असल्याची नोंद झाली आहे. नेपाळमधील महाभूकंप अन् कोयनेचा सौम्य स्वरूपाचा भूकंप याचे एकमेकांशी काही संदर्भ आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
कोयनेच्या भूकंपासंदर्भात नेमके अन् सखोल संशोधन होणार का, हा कळीचा प्रश्न ऐरणीवरच आहे. मात्र, संपूर्ण देशी भारतीय तंत्रज्ञानावर आधारित कोयना जलाशयाच्या सांडव्याच्या मजबुतीकरणाचे काम पार पडले आहे. मोठा भूकंपही झेलण्यास १०५.२५ टीएमसी क्षमतेचा कोयना शिवसागर सज्ज ठेवण्यात येथील तंत्रज्ञांना यश आले आहे.
पण, भूकंपाच्या नेमक्या कारणांचा शोध लागणे अन् आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासंदर्भात प्रबोधन होण्याकामी राज्यकर्ते व प्रशासन उदासीन असून, यासंदर्भात कोणीच आवाज उठवत नसल्याने या प्रश्नाचे गांभीर्य कोणालाच नसल्याचे खेदजनक चित्र आहे.