नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याने स्वतला पेटवून घेत आत्महत्या केली. त्यांच्या नावावर जिल्हा बँकेचे कर्ज आहे.  आता त्याच्याच नावाने जिल्हा बँकेने कर्जवसुलीची नोटीस बजावली आहे. कर्जाची परतफेड करा अन्यथा दारात मंडप टाकून बॅन्ड लावून कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. आता कर्ज कसे फेडायचे तुम्हीच सांगा, असा सवाल ४८ वर्षांच्या भारतबाई येलोरे यांनी डोळ्याच्या कडा पुसत विचारला.

दोन वर्षांपूर्वीच्या रबी हंगामात येलोरे यांच्या शेतात ज्वारी, करडी, हरभरा बहरला होता.  कर्ज काढून हातात आलेले पीक जाऊ नये म्हणून फवारणीही केली. निसर्गाने हुलकावणी दिली. हातातोंडाशी आलेला घास मातीत मिसळला. पशाची चणचण, डोक्यावर वाढलेला कर्जाचा बोजा आणि बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेला तगादा सहन न झाल्यामुळे २ डिसेंबर २०१४ च्या रात्री मनोहर येलोरे यांनी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतला पेटवून घेतले.  त्यांच्या आत्महत्येनंतर हे कुटुंब अद्याप सावरलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी भारतबाई परिस्थितीशी कशीबशी झुंज देत उभ्या आहेत. मोठा मुलगा लातूर येथे तर लहान मुलगा लोहाऱ्यातच मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवित आहे. वडिलांच्या दुखाचा डोंगर जशाच्या तसा असतानाच जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना एक लाख ९७ हजार २८० रुपयांच्या कर्जवसुलीसाठी बॅन्ड वाजवून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

येलोरे कुटुंबाच्या नावे लोहारा शिवारात साडेबारा एकर जमीन आहे. ती जिरायत असल्यामुळे मागील चार वर्षांपासून पदरात काहीच उत्पन्न आले नाही.   उदरनिर्वाहासाठी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज भूकंपात मिळालेले घरकुल विकून फेडावे लागले. सध्या येलोरे कुटुंबीय भाडय़ाच्या खोलीत गुजराण करीत आहे. मनोहर येलोरे हे सोसायटीचे दप्तर लिहून त्यातून मिळणाऱ्या पशातून कुटुंबाचा गाडा हाकत होते. मनोहर येलोरे यांचे वडील लक्ष्मण येलोरे यांनी सोसायटीकडून २००८ मध्ये ६८ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले होते घरगुती कारणांमुळे कर्जाचे हप्ते थकले त्यानंतर लक्ष्मण येलोरे यांचे २००९ मध्ये निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मनोहर येलोरे यांच्या यांच्यावर घराची जबाबदारी आणि सोसायटीचे कर्ज दोन्ही येऊन पडले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६८ हजार रुपयांचे मुद्दल व त्यावरील १ लाख २८ हजार ७८० रुपयांचे व्याज असे एकूण १ लाख ९७ हजार २८० रुपयांच्या कर्जवसुलीसाठी आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनाच नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.