जिल्हय़ातील टंचाई परिस्थितीचा फटका दूधधंद्यास बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या टंचाईकाळात झालेली ३ लाख लीटर दुधाची घट भरून काढण्यास जिल्हय़ातील शेतक-यांना दीड वर्षांचा कालावधी लागला, या दरम्यान त्यांना कोटय़वधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. आता पुन्हा याची झळ सोसावी लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हय़ातील दूध उत्पादनाची एकूण सरासरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मे २०१४ पर्यंत कायम असली तरी काही तालुक्यांत ती जूनपासून घटू लागली आहे. त्यात प्रामुख्याने संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, शेवगाव, नगर, जामखेड, पाथर्डी या आठ तालुक्यांचा समावेश आहे. येथे टंचाईची परिस्थिती यंदा अधिक आहे. तुलनेत अकोले, नेवासे, राहुरी, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत या तालुक्यांत दूध उत्पादनात काहीशी वाढ झालेली आहे. परंतु जिल्हय़ाच्या एकूण संकलनात साडेसोळा हजार लीटरची घट आहे. अर्थात ही आकडेवारी दूध केंद्रात संकलित केल्या जाणा-या दुधाची आहे. बाजारात परस्पर विक्री केल्या जाणा-या दुधाचा यात समावेश नाही.
गेल्या वर्षी पाऊस (११९ टक्के) ब-यापैकी झाल्याने चा-याची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे जानेवारी ते मे २०१४ पर्यंत वाढत्या संख्येने दूध उत्पादन होत होते. मेमध्ये २३ लाख ६ हजार ५८० लीटर दूध संकलन झाले. दोन वर्षांपूर्वी पावसाने दगा दिल्याने हेच संकलन मे २०१३ मध्ये २० लाख २३ हजार ८८७ लीटपर्यंत खाली आले होते. आता गेल्या महिन्याच्या तुलनेत जून २०१४ मध्ये संकलन २२ लाख ९० हजार १५८ पर्यंत खाली आले आहे. टंचाईची अशीच परिस्थिती राहिल्यास जुलैपासून दूध उत्पादन आणखी खाली येईल, अशी शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी साडेसोळा हजार लीटरचा फरक फारसा मोठा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काही तालुक्यांत दूध उत्पादन कमी झाल्याचे सांगताना हा टंचाईचा परिणाम नाही, लोक जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर पंढरपूरला दिंडीसाठी जातात, िदडीतील भाविकांना गावोगावचे लोक दूध देतात आदी कारणामुळे फरक पडू शकतो, असे स्पष्ट केले.
सन एप्रिल २००८ ते मार्च २००९ मध्ये २१ लाख १० हजार लीटर, सन २००९-१० मध्ये २१ लाख ८० हजार लीटर, सन २०१०-११ मध्ये २१ लाख १८ हजार लीटर, सन २०११-१२ मध्ये २३ लाख ४ हजार लीटर, सन २०१२-१३ मध्ये २० लाख ९४ हजार लीटर व सन २०१३-१४ मध्ये २० लाख २६ हजार लीटर सरासरी दूध संकलित झाले होते. जिल्हय़ात झालेल्या दुधाच्या उत्पादनातील घट भरून येण्यास डिसेंबर १३ पासून सुरुवात झाली होती. परंतु यंदा पावसाने दगा दिल्याने जून १४ पासून दुधात घट सुरू झाली आहे.