सातारा जिल्ह्यात अजून पावसाची खूप आवश्यकता आहे. मात्र जलशिवार योजना तसेच पाणी साठवण्याच्या विविध उपक्रमांमुळे टँकरने पाणीपुरवठा केवळ १७ ठिकाणी होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयात सुमारे ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे, मात्र पावसाची आवश्यकता अजून नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यात जलशिवार तसेच विविध उपक्रमांतर्गत दुष्काळी भागातही पाणी सध्या पुरेसे आहे, मात्र पावसाने दिलेली ओढ ही चिंताजनक आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांना दिलासा मिळू शकतो, तसेच रब्बीलाही हा पाऊस उपयोगी पडेल. या पावसापूर्वी टँकरची संख्या ३२ होती ती आता १७ झाली आहे. पिण्यास पाणी जलशिवारातून मिळेल, मात्र पाऊस जास्त झाला असता तर शेतकरी नगदी पिकांकडे वळला असता आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे. यंदा मात्र तसे झाले नाही. पाऊस नियमित झाला असता तर मात्र हे चित्र दिसले असते, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यात पाच बंधारे प्रगतिपथावर आहेत. यात वसना, माणगंगा आणि येरळा नदीवरील बंधाऱ्यांचे काम समाधानकारक आहे असे मुद्गल म्हणाले.