महाराष्ट्रात धार्मिक दहशतवाद उफाळून आला आहे. त्यामुळे त्यांनाही त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दलितांनी आत्मसंरक्षणार्थ हातात शस्त्रे घेऊन सडेतोड उत्तर देण्याचा सल्ला रिपाइंचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिला.
कवाडे बुधवारी खासगी कार्यक्रमानिमित्त िहगोलीत आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात रिपाइं कार्यकर्त्यांची बठक घेतली. त्या बठकीत ते म्हणाले की, विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला रिपाइंच्या वतीने जवखेड हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी मोर्चा नेण्यात येणार आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दलितांना शस्त्राचा परवाना देण्याची मागणी यापूर्वी रामदास आठवले यांनी नव्हे, तर खैरलांजी प्रकरणानंतर आपणच केली होती. परंतु आता शस्त्र परवानगी मागण्याच्या फंदात न पडता दलितांनीच शस्त्रे काढून प्रतिकार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यातील घडामोडींवर बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकार दलितांवरील हल्ले थांबविण्यात कमी पडले आहे. महाराष्ट्रात धार्मिक दहशतवाद उफाळून आला आहे. त्यामुळे त्यांनाही त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. मनसे, शिवसेना, भाजपची मंडळी िहसक आंदोलने करतात, त्यावेळी त्यांच्यावर नक्षलवाद्यांचे आक्षेप का लावण्यात येत नाहीत, असा प्रश्न करून कवाडे म्हणाले की, आमच्यावर मात्र नक्षलवाद्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे. नक्षलवादाशी जोडून आंबेडकरवाद्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा जातीयवाद्यांचा हा डाव असल्याचा आरोप कवाडे यांनी केला.
जवखेड हत्याकांडाची चौकशी दहशतवादी कारवायाच्या धर्तीवर एटीएस व सीबीआयकडून करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ अटोटे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेश पडघन, बीडचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरूकमारे यांच्यासह शेकडो कार्यकत्रे उपस्थित होते.