देशात सर्वच क्षेत्रात प्रगतीशील समजले जाणारे महाराष्ट्र राज्य गेल्या पंधरा वर्षांत पिछाडीवर राहिलेले आहे. राज्याचा विनाश घडविणा-या राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून हटविले पाहिजे. महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासशील होण्यासाठी भाजपा नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचे शासन आणावे, असे आवाहन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर सभेत केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारासाठी घोरपडे नाटय़गृह चौकात बुधवारी जाहीर सभा झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई-विरार मतदारसंघाचे निरीक्षक विनय महाजन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे यांनी हाळवणकर यांना पाठिंबा जाहीर केला. या सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आघाडीच्या शासनाच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढून अवघ्या तीन महिन्यांत केंद्र शासनाने सर्वच क्षेत्रात चालविलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपाला २७२ जागा मिळणे अशक्य असल्याचे सांगितले जात होते. पण निकालानंतर ते शक्य असल्याचे दिसून आले. तद्वतच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे १५१ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून सुषमा स्वराज यांनी याकरिता राज्यातील परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले. १५ वर्षांच्या कालावधीत आघाडी सरकारचा कारभार लोकांना त्रस्त करणारा आहे. त्यांचा कामाचा लेखा जोखा पाहिला तर मान शरमेने खाली झुकते. औद्योगिक, कृषी विकासात पुढे असलेले सध्या पुच्छप्रगती करीत आहे. तर औद्योगिक विकास घटला असून बेरोजगारी वाढली आहे. सर्वच क्षेत्रात पुढे असणारा महाराष्ट्र आता शेतकरी आत्महत्या, पोलिस आत्महत्या, गुन्हेगारी, सायबर क्राइम, धावत्या रेल्वेतील अपराध, जमिनीच्या भांडणावरून हत्या यामध्ये पुढे आहे. त्यामुळेच राज्याचा विनाश करणा-या दोन्ही काँग्रेसला बाजूला सारून विकासाची हमी देणा—या भाजपाला राज्याच्या सत्तेत आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र शासनाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे असा उल्लेख करून स्वराज म्हणाल्या, जगातील पाच प्रमुख देशांपकी चीन, अमेरिका या देशांचे परराष्ट्रमंत्री भारतात येऊन गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीनंतर त्यांनी भारताचा विकास निश्चितपणे होईल, अशी शक्यता बोलून दाखविली आहे. ही सर्व लक्षणे भारत प्रगतीच्या दिशेने जात असल्याचे दर्शवित असून जग आता भारताकडे प्रतिष्ठेच्या नजरेने पाहत आहे. केंद्र शासन सर्वच क्षेत्रात प्रगती करू लागले असून विकासाची फळे स्थानिक पातळीवरही पोहोचविली जाणार आहेत. पर्यटन क्षेत्रानंतर केंद्र शासन वस्त्रोद्योगाकडे अधिक लक्ष देत आहे. देशाचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढण्याबरोबरच इथला माल आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचून निर्यात वाढण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कामाच्या जोरावर लोकांची मने जिंकलेले सुरेश हाळवणकर यांना विजयी करून इचलकरंजी लुटणा—या प्रकाश आवाडे यांना पराभूत करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.