महापौर सुनीता राऊत यांनी पदाचा राजीनामा सोमवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे सोपवला. त्या गेले सात महिने या पदावर होत्या. महापौरांच्या राजीनाम्यानंतर नव्या महापौर निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता अहे. आघाडीतील सत्ता वाटप सूत्रानुसार काँग्रेस व राष्ट्रवादीला महापौर, उपमहापौर व अन्य पदे विभागून देण्याचे धोरण आहे. सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राऊत यांची महापौरपदी निवड झाली होती. त्यांना हे पद सहा महिन्यांसाठी देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष राजीनामा देण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी निघून गेला.
सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. एक वाजता सुरू झालेली सभा तब्बल पाच तास सुरू होती. सभेचे कामकाज आटोपल्यानंतर सभागृहातच राऊत यांनी पदाचा राजीनामा आयुक्त बिदरी यांच्याकडे सुपूर्द केला. जानेवारी महिन्यापासून नगरसेवक व प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. हद्दवाढ, टोलसाठी सल्लागार समिती, राजर्षी शाहू स्मारक, पंचगंगा नदी प्रदूषण आदी उल्लेखनीय कामे केली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.