दुष्काळी परिस्थिती असतानाही ‘केवळ’ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास राजी होणारे  माजी राज्यमंत्री आणि सद्यस्थितीत सिन्नर तालुका राष्ट्रवादीचे नेते असलेले तुकाराम दिघोळे यांच्या या कार्यक्रमाविषयी जनतेच्या मनातील भावभावना ‘लोकसत्ता’ ने मांडल्यानंतर त्याची दखल राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकाऱ्यांसह दस्तूरखुद्द दिघोळे यांनाही घेणे भाग पडले.
खरे तर दिघोळेंवरील प्रेमामुळे आणि त्यांच्या नेमस्त स्वभावामुळे सिन्नर येथे आयोजित या सोहळ्यास एरवी जिल्ह्यातील बहुसंख्य सर्वपक्षीय मान्यवरांनी आनंदाने उपस्थिती लावली असती.
परंतु पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असलेल्या सुहास कांदेने सोहळा आयोजनाचा हा सर्व
खटाटोप केल्याचे आणि तोच अभिष्टचिंतन सोहळा समितीचा अध्यक्ष असल्याचे समजल्यानंतर बहुतेकांनी स्वत: न जाता आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना कार्यक्रमास पाठविण्याची चलाखी केली.
स्थानिक दैनिकांमध्ये प्रसिध्द झालेल्या जाहिरातींनुसार वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते दिघोळे यांचा सत्कार होण्याचे योजिले होते, परंतु  या कार्यक्रमास अनुपस्थित राहणारे
विनायकदादा दुसऱ्या दिवशी पिंपळगाव येथील कांदा व्यापारी असोसिएशनच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले.
‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत जनतेच्या भावभावनांचे प्रतिबिंब मांडणाऱ्या या वृत्तपत्रास आपल्या भावना कळल्याच नाहीत, असे शल्य सोहळ्यात व्यक्त करणाऱ्या दिघोळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाच खरे तर कांदेविषयी जनतेच्या मनात असलेल्या भावना कळल्या नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.    
लोकसत्तात आलेल्या वृत्ताचे राष्ट्रवादीमधीलच आणि विशेषत: सिन्नर तालुक्यातील अनेक नेत्यांनी स्वागत केले. सिन्नरमध्ये पाणी व चाऱ्याचा दुष्काळ एकवेळ सर्वजण समजू शकतात, परंतु सक्षम नेत्यांचा दुष्काळ आहे काय, असा प्रश्न खुद्द स्थानिक नेत्यांना पडला आहे.
राज्यमंत्री असताना वडांगळीत एका युवा कार्यकर्त्यांच्या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त दिघोळे गेले असता त्यांच्या गाडीभोवती अनेकांनी गराडा घालत समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत काहींनी त्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला.
त्यावेळी ‘धक्काबुक्की करणाऱ्या अशा माणसांपासून दूर राहिलेलेच बरे’ ही प्रतिक्रिया
व्यक्त करणारे दिघोळे हे कांदेसारख्या पोलिसांच्या लेखी आजही गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या व्यक्तीपासून दूर का राहात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.