स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षेचा निकाल शंभर दिवसांत जाहीर केला खरा; परंतु विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालयांत पदवीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्णतेचा फटका बसल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे.
लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षांतील २५०पकी केवळ १६ विद्यार्थी कसेबसे उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित २३४ विद्यार्थी अनेक विषयांमध्ये अनुत्तीर्ण असून, त्यांना ०, ४, ५ असे गुण देण्यात आले आहेत. हे गुण पाहून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. विद्यापीठाच्या नियमानुसार केवळ दोनच विषयांची पुनर्तपासणी करता येते. एका विषयासाठी ३५० रुपये शुल्क भरावे लागते. प्रत्यक्षात सर्वच विषयांत विद्यार्थ्यांना ० ते १० गुण दिले असतील तर त्यांनी करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. दरगड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण विद्यापीठातील परीक्षा विभागप्रमुखांशी संपर्क साधला. काही नमुना उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करू. यानंतर हा प्रकार उत्तरपत्रिका तपासण्याच्या चुकांमुळे घडला की संगणकाची चूक की विद्यार्थीच दोषी, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच विद्यापीठ आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. जाधव यांनी, आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ते परीक्षेस उपस्थित असताना अनुपस्थित, मागील वर्षी उत्तीर्ण असतानाही एटीकेटी असे गुणपत्रिकेवर नमूद झाले. विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष असून विद्यापीठाशी आपण यासंबंधी संपर्क साधणार असल्याचेही सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपण आजच या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेणार असून, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. नेमका प्रकार कशामुळे घडला आहे, याचाही तपास केला जाईल, असे ते म्हणाले.
निकालामधील घोळ; विद्यार्थ्यांची घालमेल!
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षांच्या निकालाने विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. अनेक विद्यार्थ्यांना शून्य ते एक अंकी गुण, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांस अनुपस्थित दाखवण्याचा प्रताप विद्यापीठाकडून घडला. विद्यापीठाच्या या तुघलकी कारभाराने बुधवारी शेकडो विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.
विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पार पडल्या. परीक्षा होऊन ३ महिने उलटले, तरी परीक्षांचा निकाल लागत नव्हता. विविध विद्यार्थी संघटनांनी या बाबत विद्यापीठ प्रशासनाकडे रेटा लावला. परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन मात्र नॅक समितीचे आदरातिथ्य करण्यात व्यस्त होते. निकालास विलंब होत असल्याने विद्यार्थी संघटना, तसेच माध्यमातूनही विद्यापीठ प्रशासनाची गोची झाली. विद्यार्थी संघटनांच्या आग्रही रेटय़ानंतर कुलगुरूंनी या बाबत निकाल त्वरेने लागावा या साठी पाठपुरावा सुरू केला. प्राध्यापकांना पेपर तपासण्यात रस नाही, अशीही कुजबूज समोर आली होती. वारंवार सांगूनही प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठांतर्गत दीडशे प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या.
कुलगुरूंच्या कारवाईनंतर प्राध्यापकांनी पेपर तपासण्यास अनुकूलता दर्शवली खरी. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्राध्यापकांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमार्फत उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेतले. बुधवारी सायंकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आले. पदवी अभ्यासक्रमाच्या सर्वच विषयांत बहुतांश विद्यार्थ्यांना ० ते ९ असे एकअंकी गुणदान करण्यात आले. उत्तरपत्रिका तपासताना घ्यावयाची काळजी घेण्यात न आल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. मनाला वाटेल तसे गुणदान करणाऱ्या विद्यापीठाच्या या यंत्रणेने परीक्षेला उपस्थित काही विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवले, तर काही अनुपस्थित विद्यार्थ्यांना चक्क उत्तीर्ण करण्याचा प्रताप केला. निकाल पाहिल्यानंतर सर्वच विद्यार्थी संघटना कमालीच्या संतापल्या.  
विद्यापीठाच्या तुघलकी कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षांतील नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. वार्षकि परीक्षेचे शुल्क भरण्याची मुदत उद्या (गुरुवारी) संपत असताना आज प्रथम सत्र परीक्षेचा निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत.
या निकालाबाबत आक्षेप असल्याने उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे व योग्य निकाल जाहीर करणे याला कालावधी लागणार आहे. मग वार्षकि परीक्षेचे शुल्क कसे भरावे, असा सवाल करून विद्यार्थ्यांनी परीक्षाच लांबणीवर टाकण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी तांत्रिक चुकीमुळे हा गोंधळ झाला असून संबंधित विद्यार्थ्यांनी यासंदर्भात आपले आक्षेप नोंदवावेत. या आक्षेपांची शहानिशा केली जाईल व कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. उत्तरपत्रिकांची फेरतपासणी नि:शुल्क करण्यात येईल तसेच वार्षकि परीक्षेचे शुल्क भरण्याची मुदत वाढवून देण्याची घोषणाही त्यांनी केली.