महावितरणचे येथील निवृत्त अभियंता डी. के. कुडतरकर (६२) यांचा बुधवारी कोल्हापूरजवळ कार झाडावर आदळल्याने अपघाती मृत्यू ओढवला. या अपघातात त्यांच्या पत्नी वृषाली (५८ ) याही ठार झाल्या. कुडतरकर बुधवारी संध्याकाळी कोल्हापूरहून सपत्निक पुण्याला चालले होते. ते स्वत:च ही कार चालवत होते. वालूर फाटय़ावर समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात कुडतरकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात वृषाली जागीच ठार झाल्या, तर कुडतरकर यांचे रुग्णालयात नेत असता निधन झाले.
महावितरणच्या येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून उत्तम कामगिरी बजावलेल्या कुडतरकर यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमी पुढाकार असे. बुद्धिस्ट सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाचे ते अध्यक्ष होते, तर पत्नी वृषाली निवृत्त शिक्षिका होत्या.