अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून शुक्रवारी आणखी ५ जणांनी माघार घेतली. त्यामध्ये खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव, नगरसेवक सुवेंद्र गांधी, गुजरातमधील उमेदवार गोपालचंद्र मालू यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय स्वप्नील देसाई, सुनीता चोरडिया जगदीश तिलकराज यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (शनिवारी) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणातील व पॅनेलच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल.
सहकार व जनसेवा या दोन्ही पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. शनिवारी अनेक जण उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. अनेकांनी अर्ज दाखल केल्याने तिसरे पॅनेल तयार होते का याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात होती, ती फोल ठरण्याची शक्यता आहे.
जनसेवा व सहकार या दोन्ही पॅनेलने गाठीभेटी व सभासदांच्या मेळाव्यावर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाला खा. गांधी यांचा विरोध होता. परंतु आता बँकेच्या निवडणुकीत पाचपुते यांनी गांधी-गुंदेचा यांच्या सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. आज सहकार पॅनेलच्या श्रीगोंद्यात झालेल्या मेळाव्यास पाचपुते व त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते तसेच त्यांचे समर्थक उपस्थित होते.