अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. अजूनही मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून अज्ञान ही या समाजातील मोठी त्रुटी असल्याचेही त्यांनी सांगितले.
रविवारी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चोपडा तालुक्यातील वसतिगृहास मान्यता देण्यात आली असून, खा. ए. टी. पाटील यांच्या मागणीनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही सुरू करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले. अल्पसंख्याक समाजावर धार्मिक पगडा कायम राहिला आहे. त्यामुळे या समाजातील अशिक्षित तरुण वेगळ्या मार्गाकडे जातात. इतर समाजाने त्यांच्यावर अन्याय केला ही भावना दूर करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. अल्पसंख्याक समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणात हे प्रमाण अधिकच कमी आहे. त्यांना प्रोत्साहन देऊन उच्च शिक्षणात मुलींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सामाजिक, सांस्कृतिक औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत अल्पसंख्याकांची प्रगती झाली पाहिजे. शैक्षणिक विकासापासून अल्पसंख्याक समाज कोसो दूर असल्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे खडसे यांनी नमूद केले. अल्पसंख्याक समाजास नवीन उद्योग उभारून तसेच रोजगारनिर्मिती करून पुढे आणले पाहिजे, अशी अपेक्षा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. या वेळी खा. ए. टी. पाटील, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान हे उपस्थित होते.

दरडीखाली दबल्याने दोघांचा मृत्यू
वार्ताहर, जळगाव<br />रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे भोकर नदीपात्रात दरड कोसळल्याने दोघांचा दाबले गेल्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
तामसवाडी येथील रहिवासी प्रल्हादसिंग शंकरसिंग राजपूत (५२), कडू ढाकणे (४२) हे भोकर नदीपात्रात असलेल्या सरकारी खदानीच्या दरडीजवळ विश्रांती घेत बसले होते. अचानक दरड कोसळल्याने माती व मुरुमाखाली राजपूत, ढाकणे हे दाबले गेले. गावात या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ढिगारा बाजूला करून दोघांना बाहेर काढले. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.