नक्षलवाद्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देणारे, प्रचंड यशस्वी परंतु तितकेच वादग्रस्त ठरलेले ‘सलवा जुडूम’ अभियान येत्या २५ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचे प्रणेते दिवंगत महेंद्र कर्मा यांचा मुलगा छबिंद्र यांनी या अभियानाला पुन्हा उभारी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र हे अभियान दडपून टाकण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे.
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगड राज्यात २००५ मध्ये स्थानिक आदिवासींनी नक्षलवाद्यांविरोधात उठाव केला होता. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराला त्यांच्याच शब्दात उत्तर देणाऱ्या या अभियानाला कुटरू या गावातून सुरुवात झाली होती व पुढे ते सलवा जुडूम या नावाने ओळखले गेले. काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या अभियानात लाखो आदिवासी सहभागी झाले होते. राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारनेही या अभियानाला सक्रिय पाठिंबा देत आदिवासी तरुणांच्या हाती बंदुका दिल्या होत्या. या तरुणांना विशेष पोलीस अधिकारी हा दर्जाही बहाल केला. या अभियानातून निर्माण झालेल्या संघर्षांत एक हजारांहून अधिक लोक मारले गेले. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर हे अभियान थंडावले. २०१३च्या मे महिन्यातच नक्षलवाद्यांनी महेंद्र कर्मा यांची क्रूर हत्या केली. आता याच कर्मा यांच्या मुलाने सलवा जुडूमला नवसंजीवनी देण्याची घोषणा केली आहे. २५ मे रोजी दंतेवाडा जिल्ह्य़ातील फरसपाल येथून या अभियानाला सुरुवात होईल, असे छबिंद्रने म्हटले आहे. यात पहिल्या अभियानात सक्रिय असलेले चैतराम अट्टामी, टी. विजय व सत्तार अली हे नेते सहभागी होत आहेत. मात्र, बिजापूरमध्ये तेव्हा सक्रिय असलेले के. मधुकरराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अद्याप यात सहभागी होण्यास होकार दर्शवलेला नाही.
दरम्यान, पुनश्च सलवा जुडूमच्या घोषणेवर नक्षलवाद्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हे जनताविरोधी अभियान तेवढय़ाच ताकदीने चिरडून टाकले जाईल, अशी धमकी एका पत्रकातून दिली आहे. नव्याने सुरू होत असलेले हे अभियान ग्रीनहंट या सरकारी मोहिमेचे दुसरे रूप असून यात काँग्रेस व भाजप एकत्र आले आहेत, असा आरोपही नक्षलवाद्यांनी केला आहे. छबिंद्र कर्माने मात्र जनतेसाठी बलिदान देण्याचा कर्मा घराण्याचा इतिहास असून नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता हे अभियान पुढे रेटले जाईल असे म्हटले आहे.
महेंद्र कर्मा यांच्या पत्नी व छबिंद्रच्या आई देवती कर्मा सध्या दंतेवाडाच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यांनी या प्रकारावर मौन बाळगले आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!