जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघात भाजप-रिपाइं (आठवले गट) या पक्षांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. रिपाइंच्या या जागेवर भाजपने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला ऐनवेळी अधिकृत पत्र दिले होते. माघारीच्या दिवशी संबंधिताने माघार घ्यावी असे प्रयत्न झाले. पण भाजपचा उमेदवार अंतर्धान पावल्यामुळे माघार होऊ शकली नाही. यामुळे या जागेवर भाजप-रिपाइंचे उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माघारीची मुदत बुधवारी संपुष्टात आल्यानंतर सर्व मतदारसंघांतील अंतिम चित्र स्पष्ट झाले. सर्वच राजकीय पक्षांनी बंडोबांना शांत करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. ज्या मतदारसंघात प्रबळ असे काही उमेदवार होते, त्यांच्या माघारीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मनधरणी करण्यात आली. भाजप व रिपाइंच्या जागा वाटपात देवळालीची जागा रिपाइंला मिळाली आहे. या ठिकाणी रिपाइंने प्रकाश लोंढे यांना उमेदवारी दिली. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या रामदास सदाफुले यांना याच मतदारसंघासाठी ऐनवेळी अधिकृत पत्र देऊन अर्ज भरण्यास सांगितले होते. नंतर ही बाब लक्षात आल्यावर संबंधिताने माघार घ्यावी यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले. बुधवारी भाजपचे उमेदवार सदाफुले कोणाच्या संपर्कात नव्हते. ते अंतर्धान पावले होते. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सदाफुले यांच्याशी उशिराने संपर्क झाला. त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आले, परंतु तोपर्यंत माघारीची वेळ संपुष्टात आली होती, असे सांगितले. या संदर्भात प्रदेश पातळीवरून मार्गदर्शन घेऊन पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सदाफुले यांची उमेदवारी कायम राहिल्याने भाजपची अडचण झाली. या मतदारसंघात भाजप व रिपाइंचे उमेदवार आता एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. दरम्यान, भाजप-रिपाइं महायुतीचे आपण उमेदवार असून एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांला ही संधी देण्यात आली आहे. संयुक्तपणे निवडणूक लढविली जात असल्याने शहरातील इतर १२ मतदारसंघांतून रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी भरलेले अर्ज मागे घेण्यात आल्याचे लोंढे यांनी सांगितले. देवळालीतही भाजपकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.