मांजरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी सुरू झालेल्या जलयुक्त लातूर मोहिमेस आमदार अमित देशमुख यांनी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करणार असल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले. अभिनेते रितेश देशमुख यांनी कामाची पाहणी करून २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी सकाळी जलयुक्त लातूरच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला.
रितेश देशमुख यांना या चळवळीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून जाहीर करत असल्याचे डॉ. अशोकराव कुकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जलयुक्त लातूर सार्वजनिक व्यवस्थापन समितीच्या कार्यालयास आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. याप्रसंगी महापौर अख्तर शेख, डॉ. अशोकराव कुकडे, अ‍ॅड. गोमारे, नीलेश ठक्कर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या चळवळीसाठी ७५ लाख रुपये आपण उपलब्ध करून देऊ. साखर कारखाने व विविध संस्थांतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री या कामासाठी देण्याची हमीही आमदार अमित देशमुख यांनी दिली. बॉलिवूडमधील मंडळी आपापल्या परीने सामाजिक कामात योगदान देत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून यापुढे या चळवळीसाठी सहभाग वाढवणार असल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले. या मोहिमेसाठी जे जे लागेल ते ते सहकार्य आपण करत राहू. केवळ उन्हाळय़ापुरती ही मोहीम न राबवता एकूण पाणी प्रश्नासाठी दीर्घकाळ या मंडळींनी काम केले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी केली.

किराणा असोसिएशनचे ११ लाख
व्यापारी महासंघाचे प्रदीप सोळंकी यांच्या पुढाकारातून शहरातील विविध व्यापारी मंडळी आपले योगदान देत आहेत. होलसेल किराणा असोसिएशनच्यावतीने ११ लाख रुपयांचा निधी पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला. याप्रसंगी अध्यक्ष बसवराज वळसंगे यांनी ही घोषणा केली. याच बठकीत रेडिमेड असोसिएशनच्यावतीने ५ लाख रुपयांचा धनादेश जलयुक्तच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रदीप सोळंकी, बंडोपंत तांदळे यांनी सुपूर्द केला.

आज दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होऊन त्या कामाने वेग घेतला. रविवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते नागझरीत बंधाऱ्यापासून खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याचे जलयुक्त लातूरच्या कार्यालयातून सांगण्यात आले.