महाराष्ट्रात गेले दोन वर्षे सुरु असलेल्या ओबीसी धर्मातर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात या पुढे वर्षांतील ३६५ दिवसांपैकी एकही दिवस धार्मिक कर्मकांड करायचे नाही, असा निर्धार रविवारी पुण्यात झालेल्या ओबीसी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानांतर्गत पाचवी जनजागृती परिषद २२ सप्टेंबर रोजी नाशिक येथे घेण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली.
राज्यातील ओबीसींमधील विविध समाज घटकांना एकत्र करुन धर्मातरासाठी गेल्या दोन वर्षांपासून चळवळ सुरु आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर हे अभियान सुरु करण्यात आले. या अभियानांतर्गत आता पर्यंत नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे चार परिषदा घेतल्या.
पुणे येथे रविवारी झालेल्या बैठकीला सत्य शोधक ओबीसी परिषदेबरोबरच इतर सुमारे ३५ ते ४० ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. या बैठकीत या पुढे वर्षांतील ३६५ दिवसांपैकी एकही दिवस कोणतेही धार्मिक कर्मकांड करायचे नाही, त्यासाठी ओबीसी समाजात जागृती घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार बैठकीत हजर असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा घेतली. त्याचा प्रचार करण्याचे ठरले.