सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष    

मेळघाटातील दुर्गम गावांनाही जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी रस्ते उभारणीच्या कामाला गती मिळाली खरी, पण आता अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक पूल वाहून गेले आहेत. अनेक गावांमध्ये पोहोचण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

मेळघाटातील ३२० गावांपैकी २०३ गावांना डांबरी रस्त्याने जोडल्याची नोंद सरकार दप्तरी असली, तरी बहुतांश रस्त्यांवरील डांबराचे थर उडाले आहेत. १९९२ नंतर मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील गावांना बारमाही रस्त्याने जोडण्याच्या कामांना मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली होती. १९९६ पर्यंत ३१७ पैकी २२३ गावे पक्क्या रस्त्याने जोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ३५ गावांमध्ये तोपर्यंत आठमाहीच रस्ते होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार सद्य:स्थितीत २०३ गावांपर्यंत डांबरी रस्ते आहेत. तर ११९ गावांना बारमाही रस्त्याने जोडण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील ५५ गावांच्या रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. काही वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वगळून इतर ६२ गावांना डांबरी रस्त्याने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. पण, रस्त्यांऐवजी पुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. मेळघाटात अनेक ओढय़ांवर पूल आहेत, पण रस्ते गायब आहेत. तर काही ठिकाणचे पूल पहिल्याच पुरात वाहून गेले आहेत.

कामांचे नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ते आणि पूल बांधण्यात आले. एक ते दोन वर्षांतच ते खराब झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटात ४० लहान पूल, ३२५ मोऱ्या, ४० फ्लश, व्हेंटेड कॉजवे उभारण्यात आले, त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. यापैकी अनेक पूल वाहून गेले आहेत. कॉजवे उखडले आहेत. या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. खराब रस्त्यांऐवजी जुनी पायवाट बरी असे म्हणत आदिवासींना मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मेळघाटातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामाच्या वेळी नियोजन करण्यात आले नाही. अनेक ठिकाणी गरज नसताना पूल बांधले गेले. त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या कामांचा खर्च आणि इतर तपशील फलकावर निर्देशित करणे बंधनकारक असताना मेळघाटातील अनेक रस्ते याला अपवाद ठरले आहेत.

तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने अनेक भागातील रस्ते खरडून गेले. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून निधीच मिळाला नाही. मेळघाटातील रायपूर-हतरू, सेमाडोह-हतरू, चुर्णी-रायपूर, बारातांडा ते परसापूर या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था कायम आहे. कारादा, काकरमल, खामदा या गावांचीही बिकट परिस्थिती आहे. उन्हाळ्यातच अनेक गावांमध्ये पोहोचणे कठीण असताना पावसाळ्यातील परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत भोकरबर्डी-धारणी-अचलपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली असून सुमारे १५ कोटी रुपयांच्या या कामाचे भूमिपूजन पाच महिन्यांपूर्वी करण्यात आले. याशिवाय आंतरराज्य रस्ते जोड योजनेअंतर्गत याच रस्त्यांच्या सुधारणेचे कामही हाती घेण्यात आले आहे. कुसुमकोट-राणीतंबोली-टिटंबा-डोलार या रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बिबामल-टिटंबा-घुटी-आकी या रस्त्याची सुधारणा केली जाणार आहे. पण, मेळघाटातील इतर रस्त्यांचे भाग्य अजून फळफळलेले नाही.

मेळघाटात रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न सर्वाधिक चर्चेत आहे. मेळघाटातून प्रवास करून मध्य प्रदेशात देडतलाईहून खंडवाकडे जाताना हा फरक लगेच लक्षात येतो. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील रस्त्यांची कुप्रसिद्धी होती. भोकरबर्डी ते धारणी मार्गाची चांगलीच दुर्दशा झाली आहे. हा प्रमुख मार्ग असून दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. पण, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

धारणी तालुक्यातील दिया ते निरगुडीला जोडणारा पूल वाहून गेल्यानंतर अनेक वर्षांपासून त्याकडे लक्षच दिले गेलेले नाही. अजूनही पावसाळ्यात गावकऱ्यांना धोकादायक परिस्थितीत नाला पार करावा लागतो.

गुणवत्ता राखणे महत्त्वाचे

मेळघाटातील अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. गुणवत्ता नियंत्रण हा प्रकारच दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर यंत्रणा गुणवत्तेकडे डोळेझाक करतात. पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याचे प्रकार कमी झाले असले, तरी रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते खराब असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांचा बळी जातो. मेळघाटातील गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आणि दळणवळणाची साधने वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. अंतर्गत रस्त्यांची सुधारणा हा महत्त्वाचा विषय आहे. रस्ते खराब असल्याने अजूनही दहा-पंधरा किलोमीटर अंतरासाठी तासभर प्रवास करावा लागतो. त्याचा परिणाम या भागातील जनजीवनावर झाला आहे. मुख्य मार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत.

अ‍ॅड. बंडय़ा साने, ‘खोजस्वयंसेवी संस्था

तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने अनेक भागातील रस्ते खरडून गेले. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून निधीच मिळाला नाही. मेळघाटातील रायपूर-हतरू, सेमाडोह-हतरू, चुर्णी-रायपूर, बारातांडा ते परसापूर या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था कायम आहे.