कोल्हापूर, सांगलीसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये लूटमार आणि दरोडय़ासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या, तसेच काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या विजय ऊर्फ बबलू संजय जावीर याच्यासह ३ आरोपींच्या कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या.
खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर आरोप असलेल्या व कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरातील पोलिसांना सळो की पळो करून सोडणाऱ्या बबलू जावीर व त्याच्या टोळीविरुद्ध पन्हाळा पोलिसांनी गतवर्षी मोक्काअंतर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई केली. या प्रकरणात तिघांना अटकही झाली होती. गतवर्षी मार्चमध्ये या तिघांना पन्हाळा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी न्यायालयाच्या आवारात पोलिसांवर हल्ला करून तेथून पळ काढला होता. गेल्या दहा महिन्यांपासून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व त्यांचे पथक या तिघांच्या शोधात होते.
विजय ऊर्फ बबलू जावीर (वय २५, गल्ली नं. ६, कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी), िपटू ऊर्फ  धनाजी पांडुरंग जाधव (वय २४, गल्ली नं. ४, कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) व अंकुश भगवान गरड (वय २४, श्रीकृष्ण गल्ली, इचलकरंजी) या तिघांच्या शोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. या टोळीचा सूत्रधार बबल्या जावीर हा कर्नाटक, आंध्र भागात लपून होता. आपले अस्तित्व लपवण्यासाठी जावीरने तब्बल १६ सीमकार्ड व दहा मोबाइल हँडसेटचा वापर केला होता.
कोल्हापूर पोलिसांना चकवा दिल्यावर याच भागात मोठा गुन्हा करणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली होती. तिघे आरोपी नांदेडातल्या शिवाजीनगर परिसरात असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यानंतर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली जितू भोसले, शेख आसीफ, अभय िशदे, विशाल वाडेकर, राजू भोसले, कोरटे यांचे पथक रात्री नांदेडात दाखल झाले. आरोपी विष्णूनगर परिसरातील घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या सहकार्याने जावीर, जाधव व गरड या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात आल्यानंतर जावीर हा िभतीवरून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
अफवांचे खंडण
कोल्हापूर पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर सकाळपासूनच नांदेडमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. कॉ. गोिवद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. मात्र, फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पानसरे खून प्रकरणाचा या कारवाईशी काहीही संबंध नाही, असे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी स्पष्ट केले. संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई झालेले हे तिघे फरारी झाले होते. गेल्या १० महिन्यांत त्यांनी काय केले, याची माहिती आता स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे.