मूर्ती चोरणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेतील उत्तरमुखी जैन मंदिरातून तीथर्ंकर पाश्र्वनाथ दिगंबर भगवानची सुमारे २५० वर्षांपूर्वीची पंचधातूची मूर्ती भरदिवसा चोरीस गेली. मूर्तीची किंमत सुमारे दोन लाख रु. आहे.  ही घटना आज, शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. मूर्ती चोरणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या आधारावर पोलिस तपास सुरु आहे.

श्रीगोंदे शहरात दोन जैन मंदिरे आहेत. त्यापैकी एक नवीपेठेतील मंदिर पुरातन आहे. या मंदिरात पाश्र्वनाथाची एक फूट उंचीची पंचधातूची मूर्ती होती. सध्या चातुर्मास असल्याने भाविकांची गर्दी होत असते. सीसीटीव्हीतील नोंदीनुसार सकाळी डॉ. बडजाते साडेनऊ वाजता दर्शनासाठी आले. त्यानंतर नऊ वाजून एकावन्नच्या सुमारास एक भामटा आला, त्याने मूर्ती पिशवीत घातली अन् तीन मिनिटांत निघून गेला. त्यानंतर डॉ.  बडजाते यांच्या पत्नी दर्शनासाठी आल्या, तेव्हा मूर्ती नाही हे लक्षात आले. त्यांनी समाजबांधवांना कल्पना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी मंदिरास भेट दिली. पुजारी चंपालाल सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

भामटा माहितगार

दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या भामटय़ाने मूर्ती चोरली त्याची छबी कैद झाली आहे. हा भामटा स्थानिक असून त्याला या परिसराची पूर्ण माहिती आह़े कोणत्या वेळेला जास्त वर्दळ नसते हे लक्षात घेऊन त्याने सकाळीच मूर्ती चोरली. आमची शोध मोहीम सुरु असून लवकरच भामटा जेरबंद होईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी व्यक्त केला.