कोकण रेल्वेमार्गावर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. बाळ माने वातानुकूलित बोगीतून मुंबई ते रत्नागिरी प्रवासा दरम्यान बाळा माने यांच्यावर हा प्रसंग ओढावला. चोरांनी लंपास केलेल्या सामानामध्ये लाखांपेक्षा जास्त मुद्देमालासह बंदुकही चोरीला गेली आहे. गेल्या काही दिवसात कोकण रेल्वेमध्ये चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याचे समोर आले आहे. माजी आमदारांसोबत घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे रेल्वे प्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दिमध्ये भारतीय रेल्वेने अनेक नवीन सुविधा राबवल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. तसेच दुपदरीकरण आणि विद्युतीकरणबाबत प्रक्रिया सुरू असून पावसाळी हंगामाला तोंड देण्यासाठी रेल्वेने तजवीज केली असून, रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. वैभववाडी-कोल्हापूर हा ११० किमी रेल्वे मार्ग मध्य व भारतीय रेल्वे महाराष्ट्र रेल्वे विकास बोर्डाच्या माध्यमातून करणार असल्याचे नियोजित आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  यांनी कोकण रेल्वच्या सुरक्षेबाबत ठोस उपाय करावे, अशी प्रतिक्रिया कोकण प्रवाशांनी व्यक्त केली आहे.