शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी पर्व साजरे करणाऱ्या सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालयास सध्या सुशिक्षितांच्या चौर्यकर्माची वाळवी लागल्याने वाचनालयाचे कर्तेधर्ते चिंतेत पडले आहेत.
जिल्ह्य़ाच्या कला व सांस्कृतिक वैभवाचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या या वाचनालयातून बहुमोल गं्रथ पसार होत आहे. लहान-मोठय़ांची ज्ञानतृष्णा भागविणाऱ्या या वाचनालयातील पुस्तकांवर काही वाचकवेडे एवढे प्रेमात पडले की, वाचनासाठी घरी नेलेली पुस्तके परत न करण्याची वृत्ती उफोळून येत आहे.
एक लाखाचा गं्रथसाठा असणाऱ्या या ग्रंथालयातून वर्षांकाठी सुमारे शंभरावर पुस्तके कमी होत आहेत. वाचनालयात संदर्भग्रंथ, ऐतिहासिक पुस्तके, कथा, कादंबऱ्या, नाटके, मासिके लोकांच्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. २०० रुपये अमानत शुल्क व महिन्याकाठी नाममात्र १५ रुपये आकारून सदस्यांना एक पुस्तक व एक मासिक दिले जाते. त्याला वर्षांनुवर्षे भरभरून प्रतिसाद लाभत असल्याने नवनवी पुस्तके विकत घेऊन वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. मात्र, काही पुस्तकप्रेमी सदस्य नेलेले पुस्तक परतच करीत नाही. अशांना वारंवार स्मरणपत्रे दिली जातात. त्यास प्रतिसाद न मिळाल्यास वाचनालयाचा कर्मचारी सदस्यांच्या घरी पोहोचतो. तरीही खंत म्हणूनही पुस्तक परत न करण्याची भावना दिसू येते. अशी हजारावर पुस्तके परत आलेली नाहीत. काहींचे चौर्यकर्म असले तरी तीन वर्षांनंतर पुस्तक आठवणीने परत आणून देणाऱ्यांचीही उदाहरणे आहेत. मात्र, हे तसे विरळाच. डॉक्टर, वकील अशा पेशातील काही सदस्यांनी तर पुस्तक घेतल्याची नोंद न करता बॅगेत पुस्तक ठेवून घेण्याचीही हुशारी दाखविली आहे.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज म्हणाले, सुशिक्षित पांढरपेशा वर्गातीलच असणाऱ्या वाचकांमध्ये पुस्तक परत न करण्याची उदाहरणे आहेत. वाचकांच्या विश्वासापोटीच हा सार्वजनिक उपक्रम चालतो. त्यांनीच सद्भावना गहाण ठेवली तर उपक्रम चालणार कसा, असा प्रश्न ते उपस्थित करतात. पुस्तक परत न देता काउंटरवर पुस्तक परत केल्याचा दावा करीत कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारेही काही महाभाग आहेत ते निराळेच. असे व्यसन जडलेल्या काहींची तर झाडाझडती घेऊन चोरी पकडण्यात आली.
ग्रंथपाल शैलजा देशपांडे म्हणाल्या, पुस्तक परत न करण्याची वृत्ती ही सहज नाही. त्यामुळे वाचनालयातील ग्रंथसंपदा जपण्याचे काम खूप जिकिरीचे ठरले आहे. वारंवार सूचना देऊनही पुस्तक परत न केल्यास पोलीस तक्रार थोडीच करणार, असे त्या विचारतात. काही पुस्तके बाजारात उपलब्धच नसतात. ती चोरीला जाणे म्हणजे ठेवाच हरविल्याची भावना कर्मचाऱ्यांक डून व्यक्त होते. बाजारात हजार रुपये किमतीचे पुस्तक गं्रथालयास सवलतीच्या दराने उपलब्ध होते. विकत घेण्यापेक्षा ग्रंथालयातच हात मारण्याही हेतू काही ठेवतात.
अशा चौर्यकर्माची वाळवी वाचनालय प्रशासनाची चिंता वाढवू लागल्याचे चित्र एकीकडे असतांनाच स्वत:हून ग्रंथदान करणाऱ्यांचीही उदाहरणे संचालकांना दिलासा देणारी आहेत.