मंगळवेढय़ात एका ठेकेदाराच्या घरावर चोरटय़ांनी सशस्त्र दरोडा घालून ३१ तोळे सोन्याचे दागिने व परदेशी चलनासह सुमारे सहा लाखांचा ऐवज लुटून नेला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्य़ाची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.
सुभाष खटकाळे हे शासकीय ठेकेदार असून त्यांचा मंगळवेढय़ात साई पॅलेस नावाचा बंगला आहे. पहाटे चौघा चोरटय़ांनी बंगल्यात घुसून धुडघूस घातला. तोंडाला रुमाल, हातात चाकू, काठी व सळई अशा अवस्थेत घुसलेले दरोडेखोर पाहून खटकाळे कुटुंबीय भेदरून गेले. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करून बंगल्यातील कपाट उघडण्यास भाग पाडले. कपाटातील सोन्याचे किमती दागिने, रोख रक्कम, परदेशी चलन आदी ऐवज दरोडेखोरांच्या हाती लागला. कपाटातील सोन्याचे दागिने घेतल्यानंतर दरोडेखोरांची नजर खटकाळे कुटुंबीयातील महिलांकडे गेली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही दरोडेखोरांनी बळजबरीने काढून घेतले.
मंगळवेढय़ात अलीकडे पडलेला हा दुसरा मोठा दरोडा आहे. अधूनमधून छोटे मोठे दरोडे व घरफोडय़ा तथा चोऱ्यांचे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे रात्री मंगळवेढय़ातील नागरिकांना स्वत:च्या संपत्तीच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटू लागली आहे.
प्राध्यापकाचे घर फोडले
शहरातील दमाणी नगराजवळील सोनी नगरात चोरटय़ांनी भर दिवसा एका प्राध्यापकाचे घर फोडून सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. प्रा. चंद्रकांत दुधाळे हे मोहोळ येथील महाविद्यालयायत सेवेत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहन अपघातात ते जखमी झाल्याने उपचारांसाठी त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीय रुग्णालयात गेल्याची संधी साधून चोरटय़ांनी प्रा. दुधाळे यांचे घर फोडले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.