नाशिकरोड परिसरातील बिटको चौकात दिशाभूल करून सुमारे साडेआठ लाख रुपयांची रोकड दोघा भामटय़ांनी दिवसाढवळ्या लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एचडीएफसी बँकेच्या बाहेर हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यशश्री लॉजेस्टिक या कंपनीत लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या विजय शिरसाठ यांनी याप्रकरणी तक्रार दिली. कंपनीची रक्कम काढण्यासाठी ते बुधवारी सकाळी चारचाकी वाहनाने चालकासमवेत एचडीएफसी बँकेत आले होते. बँकेतून साडेआठ लाख रुपये काढल्यानंतर ते वाहनात येऊन बसले. या वेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली. त्याने शिरसाठ यांना बँकेच्या व्यवस्थापकांनी तुम्हाला बोलाविल्याचे सांगून नेले. या वेळी दुसऱ्या व्यक्तीने येऊन वाहनचालकास तुम्हालाही बँकेत बोलाविले असल्याचे सांगितले. वाहनचालक निघून गेल्यानंतर संबंधिताने रोकड असणारी बॅग घेऊन पोबारा केला. बँकेत गेल्यानंतर शिरसाठ यांना आपली दिशाभूल करण्यात आल्याचे लक्षात आले. चालक व त्यांनी मोटारीकडे धाव घेतली असता पैशांची बॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.