यंदाच्या पावसाळ्यात एकीकडे वरूणराजा कोपला असतानाच नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील जेमतेम उरलेल्या पिण्याच्या पाण्याचीही राजरोस चोरी झाल्याची बाब उघड झाली आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला मोठय़ा प्रमाणात बसला. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडकरांची पावसाळ्यातही भटकंती सुरू आहे. नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी दिग्रस बंधाऱ्यातून ८.६८ दलघमी पाणी विष्णुपुरी प्रकल्पात सोडले होते. पाणीटंचाई लक्षात घेऊन यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सिंचनासाठी पाणी घेण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. शिवाय पाण्याचा बेकायदा उपसा होऊ नये, या दृष्टीने महावितरण अधिकाऱ्यांनाही कडक निर्देश देण्यात आले होते. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन करताना आणखी काही प्रकल्पांतून पाणी आणता येईल का, या दृष्टीने जिल्हा प्रशासन व महापालिकेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विष्णुपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याचा बेकायदा उपसा झाल्याची बाब उघड झाली आहे. दिग्रस बंधाऱ्यातून ८.६८ दलघमी पाण्यापकी ३.७६ दलघमी पाण्याचा सिंचनासाठी उपसा केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. महापालिका प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी ही गंभीर बाब एका पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
दरम्यान, ऑगस्टचा तिसरा आठवडा संपत आला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७.९ टक्केच पाऊस पडला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले असताना अशा प्रकारे बेकायदा उपसा झाल्याने प्रशासनातील अधिकारी अवाक झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी दक्षता पथके स्थापन केली आहेत. पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व महावितरण कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र पाठवून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने दक्षता पथकाची स्थापना केल्यानंतर महापालिका आयुक्तांनीही दक्षतापथक स्थापन केले असून अनधिकृत उपसा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
पावसाने वक्रदृष्टी केल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आले आहे. पेरणी करूनही पीक उगवेल की नाही, या बाबत साशंकता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले आहे.