राष्ट्रवादीच्या वर्तुळात महापौर बदलाच्या हालचालींना पुन्हा वेग आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर त्यासाठी आग्रही असले, तरी वरिष्ठ पातळीवरच हा निर्णय रेंगाळल्याचे समजते. शनिवारी झालेल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत याच मुद्दय़ावर ही गाडी अडल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर लगेचच शहरात या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर संग्राम जगताप या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी महापौरपद सोडावे, अशा हालचाली सुरू झाल्या असून त्याला स्वत: जगताप यांनीही नकार दिलेला नाही. मात्र वरिष्ठांचा आदेश येताच आपण महापौरपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली असून, येथेच घोडे पेंड खात आहे. मागच्या तीन महिन्यांत याच मुद्दय़ावर ही मोहीम थांबते.
कळमकर हे त्यांचे पुतणे अभिषेक यांना महापौर करावे, यासाठी आग्रही आहेत. दोनच दिवसांपूर्वी जगताप यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेतील सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. महापौर बदलाच्या दृष्टीने झालेल्या त्या बैठकीत नगरसेवकांनीही त्याला तयारी दर्शवली. मात्र शनिवारी पुन्हा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. कळमकर व महापौर जगताप हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते. एक-दोन नगरसेवक वगळता अन्य सर्व नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. बैठकीतही जगताप यांनी पुन्हा महापौरपद सोडण्याची तयारी दर्शवली. कळमकर यांनीही त्यासाठी पुन्हा आग्रह धरला. महापौरपद बदलले तर अन्य पक्षांचेही काही नगरसेवक आपल्याला मदत करतील, असा दावा त्यांनी केल्याचे समजते.
आता बदल झाला तर नव्या महापौराला जेमतेम एक वर्ष मिळेल. संग्राम जगताप यांची निवड होऊन सुमारे दीड वर्ष झाले असून त्यांचे आता एकच वर्ष राहिले आहे. त्यापुढचे महापौरपद महिलेसाठी आरक्षित आहे. सत्ताधारी आघाडीत ते काँग्रेसला जाण्याची शक्यता व्यक्त होते, मात्र आत्ताच महापौर बदलाला होत असलेला विलंब लक्षात घेता राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनाच हा बदल खरंचच करायचा किंवा नाही, याबाबत आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. स्वत: महापौर जगताप त्यादृष्टीने अनुकूलता व्यक्त करीत असले तरी जगताप पितापुत्रांना श्रेष्ठींच्या या मानसिकतेचा पुरता अंदाज आला असावा, असेही आता बोलले जात आहे. पक्षश्रेष्ठी म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच हा निर्णय घेणार असून, त्याकडेच आता सगळय़ांचे लक्ष लागले आहे.