शनिवारी साज-या होणा-या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या मुहुर्तावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल गुलाबाच्या विक्रीसाठी शुक्रवारी मिरजेतील फुलांचा बाजार सजला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत गुलाबाच्या दरात ६० टक्क्यांनी वाढ झाली असून मिरजेच्या बाजारातून गोवा, हैद्राबाद आणि दिल्लीला निर्यात करण्यात आली आहे.
आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी व्हॅलेंटाईन डेची वाट पहात असतात. या दिवशी भेट कार्डाबरोबरच लाल गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. शिवसेनेने या व्हॅलेंटाईन डेला विरोध दर्शविला असला तरी प्रेमी आपली भावना व्यक्त करण्याची संधी शोधण्याच्या प्रयत्नात असतात.
शनिवारी होत असलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्र्वभूमीवर आज मिरजेतील फुलांचा बाजार सजला होता. तासगाव, कवठे एकंद, कवलापूर, सावळी आदी भागांसह शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथून मोठय़ा प्रमाणात गुलाब फुलांची आवक बाजारात झाली होती. गतवर्षी २५० रुपये शेकडा असलेला गुलाबाचा दर आजच्या बाजारात ४५० ते ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
याशिवाय शहरातील गिफ्ट शॉपीमध्ये प्रेमिकांना एकमेकांना भेट देण्यासाठी सजविलेली गुलाबी भेटकार्डेही विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात तरुणांकडून आततायीपणा होण्याची शक्यता लक्षात घेऊन साध्या वेशातील पोलीस महाविद्यालय व बसस्थानक परिसरात तनात करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. तसेच सांगली व मिरजेत स्वतंत्र महिला पोलीस पथक गस्तीसाठी तनात करण्यात आले आहे.