निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार दाऊद इब्राहिमचा वापर करत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही. दाऊद हा पाकमध्येच असून ओसामा बिन लादेनप्रमाणे दाऊदला शोधून भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे आठवलेंनी म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप रामदास आठवलेंनी फेटाळून लावला. दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही, असेही आठवलेंनी म्हटले आहे.

सध्या निवडणूक व्हावी अशी कोणत्याच पक्षाची इच्छा नाही. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली असली तरी ते सरकारसोबत आहेत. दसऱ्याला शिवसेनेने सीमोल्लंघन केले तरी सरकार पडणार नाही असा दावा त्यांनी केला. सरकारला १५ आमदारांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचाही आम्हाला छुपा पाठिंबा असल्याचे ते म्हणालेत.

नारायण राणेंविषयी आठवले म्हणाले, काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या राणेंचे मी स्वागत करतो. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना लवकरात लवकर भाजपत घ्यावे असे आठवलेंनी म्हटले आहे. भाजपने त्यांना स्वीकारले नाही तर राणेंचे रिपब्लिकन पक्षात स्वागत आहे अशी ऑफरच त्यांनी राणेंना दिली.

देशातील सद्यस्थिती पाहता काँग्रेसला लवकर सत्ता मिळण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधी हे कमकुवत वाटतात. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी सरकारच सत्तेवर येणार असून माझा मोदी सरकारला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे सरकारला माहित आहे. ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही. पण यावर तोडगा शक्य आहे.  याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असून मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.