समाजातील विविध क्षेत्रांत काम करीत असताना संघाचा स्वयंसेवक असल्याचा विसर पडता कामा नये. संघाचा स्वयंसेवक म्हणून समाजाच्या विविध क्षेत्रांतील लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे स्वच्छ, पारदर्शिकपणा, प्रामाणिकता, निष्ठेने आणि सजग राहून काम करावे लागेल. अकारण वाद टाळायला हवा. तेढ निर्माण होणाऱ्या बाबींना थारा देता कामा नये. संघटन बांधणीसह समन्वयावर भर द्यावा, आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
 शनिवारी संघ परिवारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, रवींद्र भुसारी, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बैठकीत होते.
रा. स्व. संघ परिवाराच्या चाळीस संघटना कार्यरत असून भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम, क्रीडा भारती आदी संघटनांचा त्यात समावेश आहे. या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दरवर्षी दोन दिवस समन्वय बैठक होत असते. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गेल्या वर्षी ती मुंबईत झाली. यंदा रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात ती सुरू झाली. उद्या दुपापर्यंत ती चालणार आहे. महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पश्चिम क्षेत्र कार्यवाह डॉ. रवींद्र जोशी यांच्यासह संघाचे मोजके वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला दोनही दिवस उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे संघ स्वयंसेवकांना विशेष आनंद झाला आहे. सरकारला त्याचे काम करू द्या, असा निसटता उल्लेख तेवढा झाला.