राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत मोहन भागवत यांचे नाव चर्चेत असले तरी मोहन भागवत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अशा बातम्यांकडे मनोरंजन वार्ता म्हणून बघितले पाहिजे असे भागवत यांनी सांगितले. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि यापुढेही राहणारच असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते. शिवसेनेच्या या विधानानंतर मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले. यापार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठानतर्फे बुधवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोहन भागवत अतिथी होते. भाषणाच्या सुरुवातीलाच भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या कधीच खऱ्या ठरणार नाही. संघात मोठे पद स्वीकारल्यानंतर आमच्यासाठी बाकीचे दार बंद असतात असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. माझे नाव राष्ट्रपतीपदासाठी आले तरी मी ते पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते. उद्धव ठाकरे यांना मोहन भागवत राष्ट्रपती व्हावेत असे वाटते. हिंदू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर भागवत यांना राष्ट्रपती करायला पाहिजे असे राऊत यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदुत्त्ववादी नेता देशाच्या पंतप्रधानपदी आहे. तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याची निवड करण्यात आल्याचे सांगत राऊत यांनी हिंदूराष्ट्रासाठी मोहन भागवत राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे असे त्यांनी सांगितले होते.