नितीन गडकरींना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून घालविण्यासाठी भाजपतील विरोधकांनीच कारस्थान रचल्याचा आरोप करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी भाजपच्या वर्तुळात खळबळ उडवली असतानाच या मुद्दय़ावरून संघातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. संघाचे सहसरकार्यवाह सुरेश सोनी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी कोणताही विचारविमर्श न करता भाजपतील अंतर्गत राजकारणात केलेल्या हस्तक्षेपाची किंमत त्यांना चुकवावी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
संघाच्या नागपूर मुख्यालयातून होणारे आदेश शिरसावंद्य मानले जातात. प्रदेश शाखेला गडकरी अखेरच्या क्षणापर्यंत अध्यक्ष होतील, याची पूर्ण खात्री होती, परंतु म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमापूर्वी गडकरींना हटविण्याचा निर्णय झाल्याचे सरसंघचालकांना कळविण्यात आले तेव्हा ते पनवेलमध्ये होते. त्या वेळी सुरेश सोनी यांनी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले, परंतु ही चर्चाच झाली नसल्याचे समजते. संघाच्या एखाद्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सरसंघचालकांच्या आदेशाची पायमल्ली करणे संघ परिवाराने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे सुरेश सोनींचे जाणे जवळजवळ निश्चित असल्याचे सूत्राकडून समजते.  
भाजपच्या प्रदेश शाखेला गडकरींचे अध्यक्षपद जाणे आणि त्यांच्या जागी राजनाथ सिंह यांचे येणे याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. राजनाथ सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास प्रदेश शाखेला कोणतीही हरकत नाही, परंतु गडकरींना घालविण्याच्या निमित्ताने संघ परिवारातील मतभेद चव्हाटय़ावर आल्याने त्याचे भविष्यातील परिणाम अधिक चिंताजनक आहेत.