राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशात ५० हजाराहून अधिक शाखा असून आगामी सहा महिन्यात देशभरात संघाच्या आणखी साडेतीन हजार शाखा सुरू करून संघकार्य वाढवण्याचा निर्णय संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
चेन्नई येथे २ व ३ नोव्हेंबरला ही बैठक पार पडली. संघाच्या ४१ प्रांतांतील कार्यवाह, प्रचारकांसह चारशे प्रतिनिधी बैठकीला हजर होते. गेल्या सहा महिन्यांतील संघकार्याचा व देशातील परिस्थितीचा आढावा त्यात घेण्यात आला. देशात संघाच्या ५० हजाराहून अधिक शाखा असून त्यात विविध वयोगटांतील स्वयंसेवक उपस्थित राहतात. एक लाख लोकसंख्येमागे एक शाखा याप्रमाणे येत्या मार्च महिन्यापर्यंत देशभरात आणखी साडेतीन हजार शाखा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला, अशी माहिती संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहकार्यवाह रवींद्र जोशी यांनी दिली आहे.   काही वर्षांपूर्वी विश्वमंडल गोग्राम यात्रा काढण्यात आली. त्यानंतर गोसंवर्धनासाठी देशभरात विविध संस्था-संघटनांनी गोशाळा सुरू केल्या. आणखी सहाशे गोशाळा सुरू करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. आंध्र प्रदेश व राजस्थानात ‘गो-पेन्शन’ योजना सुरू झाली आहे. गोसंवर्धनासाठी इच्छुक असलेल्याने टपाल खात्यात एक लाख रुपयांची ठेव ठेवावी. त्यातील व्याजातून गरजू गोपालकाला गोसंवर्धनासाठी आर्थिक मदत करावी, अशी ही योजना आहे. ही योजना राबविण्याचे ठरले. देशातील निवडक अडीचशे गावात समग्र ग्रामविकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडय़ातील मंदिरे, मातृशक्ती, शाळा, शिक्षक आदींच्या सहभागाने गावात एक मंडळ असावे व त्या मंडळाच्या माध्यमातून गावाचा सर्वागीण विकास हा त्यामागील उद्देश आहे. परिवार प्रबोधन हा आणखी एक प्रकल्प देशात राबविण्याचा निर्णय झाला. समाजावर झालेले सांस्कृतिक आक्रमण पाहता समाज व पर्यायाने कुटुंबाला सजग करण्याचा प्रयत्न आहे. आठवडय़ातून एकदा का होईना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र यावे, सहभोजन, मुलांवरील संस्कार वगैरे लहान वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या बाबी कुटुंबाच्या निदर्शनास आणल्या जातील. नवदाम्पत्यांना विशेषत: यात सहभागी करून घेतले जाणार आहे.  केंद्र शासनाने समग्र राष्ट्रीय सुरक्षा धोरण ठरवावे, तसेच केवळ आसामच नाही तर देशातील बांगलादेशी घुसखोरांना हुडकून त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, असे दोन ठराव या बैठकीत संमत करण्यात आले. आसाममधील काही जिल्ह्य़ांमध्ये घुसखोरांचे प्राबल्य वाढले असून तेथे मतदार यादीतही त्यांना स्थान देण्यात आले आहे. मतपेढीसाठी त्यांचे लाड सुरू आहेत. हे केवळ आसाममध्येच नाही तर देशाच्या विविध भागांत घुसखोर शिरले आहेत. त्यांना हुडकून तातडीने देशाबाहेर घालविले पाहिजे.  असे आवाहन ठरावातून करण्यात आले आहे.  विश्व शांती ठीक असली तरी भोळे न राहता देशाचा भूभाग कुणी हडपणार नाही, या दृष्टीने सत्ताधाऱ्यांना सजग राहावे लागेल. चीनने १९६२ मध्ये आक्रमण केले आणि मोठा भूभाग बळकावला. सध्या तर चीनने भारताला वेढले असून लष्करही तैनात केले आहे. त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवून सजग राहावे लागेल. म्हणूनच समग्र राष्ट्रीय सुरक्षा नीतीची गरज असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.