अप्पर कुंडलिका प्रकल्पात ओलिताखाली येणाऱ्या रुई ग्रामस्थांनी माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन करण्यास नकार दिला आहे. जिल्हा प्रशासनाने येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांनी इतर ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, ही मागणी लावून धरली.
वडवणी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन नव्याने होत असलेल्या ऊध्र्व अप्पर कुंडलिका प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या प्रकल्पात रुई हे सव्वादोनशे कुटुंबांचे गाव येत आहे. त्यामुळे गावातील बहुतांश कुटुंबांना सरकारने मावेजा देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या. प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा देणे अपेक्षित असताना अनेक वष्रे मावेजा देण्यात आला नाही. यावरून शेतकऱ्यांना, परिसरातील लोकप्रतिनिधींना प्रशासनासोबत संघर्ष करावा लागला. अनेक आंदोलने, उपोषण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यांना मावेजा मिळाला.
सव्वादोनशे कुटुंबांपकी साठ कुटुंबांनी मावेजा न घेता आपले इतर ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने याच प्रकल्पालगत एका डोंगराच्या पायथ्याशी या कुटुंबांसाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च करून पत्र्याचे शेड उभारले. साठ कुटुंबांचे पुनर्वसन या पत्र्याच्या शेडमध्ये करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न होते. त्या अनुषंगाने जि. प. अधिकाऱ्यांनी रुईस भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी डोंगर पायथ्याशी पुनर्वसन करून प्रशासनाला आमचा जीव घ्यायचा आहे काय, असा सवाल उपस्थित करून त्या ठिकाणी पुनर्वसित होण्यास नकार देण्यात आला.
माळीण येथे ज्याप्रमाणे डोंगरकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली. तशीच दुर्घटना येथेही होऊ शकते, या भीतीने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पुनर्वसित होण्यास नकार देत इतर ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. प्रशासनाने अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. जिल्हाधिकारी यांनी स्वत: या गावास भेट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.