खर्डा (ता. जामखेड) येथील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दलित युवकाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी ५ मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) कार्यकर्ते जिल्हाभर आंदोलन करणार आहेत. जिल्ह्य़ातील सर्व तहसील कार्यालयांवर मोर्चा नेला जाणार आहे. खा. रामदास आठवले यांनी हा खटला जलदगती न्यायालयापुढे चालवण्याची मागणी गुरुवारी खर्डा येथे केली.
पीडित आगे कुटुंबीयांची गुरुवारी सकाळी आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी नगरसह उस्मानाबाद, बीड, सोलापूर, पुणे जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित होते. न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्ष आगे कुटुंबाच्या मागे उभा राहील, असे आश्वासन आठवले यांनी दिले.
आठवले यांनी पक्षाच्या वतीने आगे कुटुंबास १ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले तसेच राज्य सरकारकडूनही ५ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नितीनला शाळेतून उचलून नेण्यात आले, तरीही शिक्षक, मुख्याध्यापकांनी पोलिसांना कळवले नाही, त्यामुळे त्यांचा आरोपींमध्ये समावेश करावा, आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी खटला जलदगती न्यायालयापुढे चालवावा व वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.