हमखास यशाची गुरूकिल्ली पटवून देताना बारावीतील एका गुणवंत विद्यार्थ्यांची छबी तब्बल तीन शिकवणी वर्गानी आमचाच विद्यार्थी म्हणून झळकावली! मात्र, या जाहिरातबाजीनेच जाहिरातदारांचे हसू झाले; परंतु विद्यार्थी-पालकांचीही करमणूक झाली. लातूर शहरात शंभरावर शिकवणीवर्ग चालविले जातात. या सर्व शिकवणीवर्गाचा होìडग, वर्तमानपत्रातील जाहिराती, पेपरमधून पत्रके या साठीच्या जाहिरातीवरील खर्चच तब्बल ५ कोटींवर असल्याचा अंदाज आहे!
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची गर्दी सुरू असतानाच आम्हीच कसे गुणवान, हे लोकांसमोर िबबवण्यासाठी महाविद्यालये, शिकवणीवर्ग यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, जाहिरातबाजीतून जाहिरात करणाऱ्यांचेच पितळ उघडे पडत आहे. स्पर्धेच्या युगात शिक्षणाच्या बाजारात आपलाच माल कसा चांगला, हे विद्यार्थी व पालकांच्या मनावर िबबवल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने ही जाहिरातबाजी सुरू आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचे शिकवणीवर्ग अकरावी-बारावी विज्ञान शाखेसाठी धुमधडाक्यात चालतात. अभियंता व डॉक्टर होण्यासाठी हमखास यशाची गुरुकिल्ली म्हणून या शिकवणी वर्गाकडे पाहिले जाते. बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून महाविद्यालये व शिकवणीवर्ग जाहिरात करतात. परंतु एकाच विषयाच्या तीन शिकवणीवर्गानी एकाच विद्यार्थ्यांचे आमचा यशस्वी विद्यार्थी म्हणून छायाचित्र प्रसिद्ध केले!
बारावीत एखादा गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयाव्यतिरिक्त एखाद्या शिकवणीवर्गात शिकत असेल, तर एका विषयासाठी किमान तो एकच शिकवणीवर्ग लावेल. एका विषयासाठी तीन शिकवणीवर्गात प्रवेश घेणे केवळ अशक्य. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो छापण्याच्या स्पध्रेत शिकवणीवर्ग एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. आपली छबी फुकट छापून येत आहे, म्हणून संबंधित विद्यार्थी तक्रार करीत नाही. बारावीनंतरच्या उच्च शिक्षण प्रवेशासाठी हे गुणवंत गुंतलेले असतात. जाहिरातबाजीविरोधात तक्रार करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. पण त्याचाच नेमका लाभ उठवला जातो.
अकरावीला प्रवेश घेताना आमचे गुणवंत विद्यार्थी म्हणून मोठी छायाचित्रे प्रसिद्ध केलेले पत्रक पालकांसमोर ठेवले जाते. शंभर टक्के निकालाची परंपरा यापासून अनेक मुद्दे मांडले जातात. शिकवणीवर्गाचे पहिलेच वर्ष असतानाही गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो कसे प्रसिद्ध केले जातात, याकडे पालकही गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांची जाहिरातबाजी सुरू असून यातून पालक व विद्यार्थ्यांची मात्र फसवणूक केली जात आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्याच्या सर्व व्यवस्था तातडीने लावण्यासाठी पालक आतुर असतात. त्यामुळे चौकसबुद्धीने वावरण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नसतो. वर्षांनुवष्रे गुणवत्तेची कास धरून काम करणारी मंडळी मात्र या व्यावसायिक स्पध्रेमुळे गांगरून गेली आहेत. गुणवत्ता नसताना चांगले वेस्टन लावून मार्केटिंग करण्याच्या जमान्यात खऱ्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. महाविद्यालयाच्या स्पध्रेतही हेच वातावरण आहे.
जाहिरातबाजीच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह!
शहरात अकरावी-बारावीचे छोटे-मोठे १०० शिकवणीवर्ग चालतात. होìडग, वर्तमानपत्रातील जाहिराती, पेपरमधून पत्रके यावरील जाहिरातीचा खर्च ५ कोटींच्या आसपास आहे. छोटय़ा शिकवणीवर्गाचा जाहिरातीवरील खर्च लाखाच्या आत असला, तरी १० लाखांपेक्षा अधिक रक्कम जाहिरातीवर खर्च करणाऱ्या शिकवणीवर्गाची संख्याही मोठी आहे. होìडग व फलकाच्या जाहिरातीपोटी महापालिकेकडे जाहिरातीच्या कराची रक्कमही भरली जाते. या जाहिरातबाजीत गुणवत्तेवर भर दिला जात असला, तरी बऱ्याचदा जाहिरात मात्र गुणवत्तापूर्ण नसते. जाहिरातीतून जो मजकूर लोकांपर्यंत पोहोचविला जातो, त्याची सत्यता असेलच याची खात्री देता येत नाही. जे जाहिरातीत छापलेले आहे, त्यानुसार शिकवणीवर्ग चालविणाऱ्यांची संख्या नगण्यच आहे.