शिवसेना-भाजपमधील युतीचे गाडे स्थानिक पातळीवर फिसकटले, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. नवी मुंबईत भाजपकडे केवळ एकच जागा आहे. तेथे शिवसेनेला युती नको आहे. औरंगाबाद महापालिकेत भाजप मोठा भाऊ बनण्याच्या मानसिकतेत असल्याने त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे. या पाश्र्वभूमीवर वरिष्ठांना युती हवी होती. मात्र, स्थानिक पातळीवर ती तुटली, असे चित्र निर्माण व्हावे अशी व्यूहरचना आखली जात आहे.
 जागावाटपाचे घोडे राजाबाजार, एन- ६ या वॉर्डामुळे अडले आहे. भाजप-सेनेतील नेत्यांनी या दोन्ही वॉर्डावर दावा सांगितला असल्याचे चित्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून कायम आहे. जी बोलणी स्थानिक नेत्यांना जमत नाही ती वरिष्ठ पातळीवर होतील, असे सांगण्यात आल्याने युतीसाठी मुंबईवारी सुरू आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व नेते हे शुक्रवारीही मुंबईतच तळ ठोकून होते. पालकमंत्री रामदास कदम आणि अनिल देसाई हे दोन नेते चर्चा करत आहेत. कदाचित उद्यापर्यंत निर्णय होईल, असे खासदार चंद्रकांत खरे यांनी सांगितले. मात्र, युती होण्याची शक्यता नवी मुंबईतील जागावाटपामुळे बिघडण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी मत्रिपूर्ण लढत होऊ शकेल, असे सांगितले जात असल्याने भाजपने समांतरच्या अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेचे नेते मात्र बोलण्यास तयार नाहीत. मात्र, समांतरची योजना मीच आणली. त्यात बदल होण्याची शक्यता नाही. कारण त्याची दोन वेळा तपासणी झाली आहे. त्यात काहीही चुकीचे नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी काही बाबी चालल्या असतील, असे सांगत खासदार खरे तिरकसपणे म्हणाले, ती मंडळी जरा जास्त हुशार आहेत. त्यांना एवढे वाटते तर अन्य योजना आणाव्यात. शहरासाठी अधिक पैसा मिळाला तर चांगलेच आहे, असेही ते म्हणााले.
 भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत असल्याने ते  मुंबईत परतल्यावर चर्चा होईल. त्यामुळे युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटतो की युतीच तुटते, हे शनिवारी समजू शकेल.
 दरम्यान, भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये उमेदवारी देण्यावरून कुरबुरी असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातही समर्थकांना उमेदवारी देण्यावरून कुरबुर सुरू आहे. त्यामुळेच गुरुवारी झालेल्या मेळाव्यास पंकजा मुंडे गैरहजर राहिल्याचे सांगितले जाते. भाजपने समांतरवरच शिवसेनेला लक्ष्य करण्याची भूमिका जाहीर प्रचारातही घेतल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. सर्वसामान्य मतदारांना मात्र ही प्रक्रिया एक नाटकच असल्याचे वाटते. या अनुषंगाने बोलताना जाणकार वाचक सतीश कुलकर्णी म्हणाले, सत्तेत असताना ४ वर्षे ११ महिने गप्प बसायचे आणि शेवटच्या महिन्यात या योजनेस आमचा विरोध आहे, असे सांगायचे म्हणजे ‘आपला तो बाळय़ा आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ असे म्हटल्यासारखे झाले. त्यामुळे भाजपची भूमिका दुटप्पी आहे.