राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतानाच कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना शह देण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या आत्मक्लेश यात्रा मुंबईत पोहचल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांमध्ये यात्रेची मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत भाजपशी वाढत्या जवळीकीमुळे सातत्याने चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरच्या पुणतांबा येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र, सदाभाऊ खोत यांची ही भेट राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारतर्फे खेळण्यात असलेला डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरूवात झाली आहे.

येत्या १ जुनपासून शेतकऱ्यांकडून संप पुकारण्यात येणार आहे. या सगळ्याच्या पूर्वतयारीसाठी पुणतांबा येथे २५ मेपासून धरणे आंदोलनला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांकडून दोन महिन्यांपूर्वीच या आंदोलनाबद्दल सरकारला निवेदन देण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून सराकरने एकदाही या आंदोलनाची दखल घेतली नव्हती. मात्र, आज राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकत असतानाच सदाभाऊ खोत शेतकऱ्यांना भेटायला आल्याने राजकीय वर्तुळात शेट्टी आणि खोत यांच्यातील दुराव्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

स्वाभिमानीसाठी सदाभाऊ खोत हा विषय संपला-राजू शेट्टी

सदाभाऊ खोत धरणे आंदोलनाच्याठिकाणी आले तेव्हा स्वाभिमानी संघटनेचा एकही कार्यकर्ता त्यांच्याजवळ फिरकला नाही, ही परिस्थिती बरेच काही सांगून जाणारी होती. दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना कोणतेही थेट आश्वासन द्यायचे टाळले. चर्चेची दारे बंद करू नका, मुंबईला या, मागण्यांवर बोलू, मग अंतिम निर्णय घ्या, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमच्यापर्यंत यावे, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना सदाभाऊ खोत यांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या संपकरी शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक सुरू असून यामध्ये सरकारच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता आहे.

‘स्वाभिमानी’तील मैत्रीचा पोपट अजूनही जिवंत-शेट्टी

दरम्यान, राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार आहे. यावेळी राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. आम्हाला यात्रेदरम्यानही सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचे सांगत, पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करणार असून, त्यावेळी राज्यकर्त्यांची पळताभूई होईल, असे शेट्टी यांनी म्हटले.