मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा येथे सुमारे तीन कोटीचा रक्तचंदनाचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरच कानविंदे फाटय़ाजवळ जुन्या घराच्या सागवानी लाकडांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक शहापूरच्या वनाधिकाऱ्यांनी पकडला. ट्रकसह सुमारे सात लाखांचा माल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी साकीनाका येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कानविंदे गावाजवळील चिंचपाडा येथील प्रकाश फसाळे व लडकु फसाळे यांच्या जुन्या घराच्या सागवानी लाकडांनी भरलेला ट्रक मुंबईकडे साकीनाका येथे नेत असताना महामार्गावर कानविंदे फाटय़ाजवळ पाळतीवर असलेल्या वनविभागाच्या भरारी पथकाने पकडला. सागवान लाकडांची चोरटी वाहतूक होणार असल्याबाबत भरारी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. खाडे, वनपाल राजेंद्र पवार, वनरक्षक एस. के. देशमुख, के. सी. मोरघे या पथकाने ही कारवाई करून साडेबारा घनमीटरचे तब्बल ३१४ सागवान लाकडाचे नग व ट्रक असा सुमारे सात लाखाचा माल जप्त केला. तसेच जुन्या घराचे सागवान लाकूड विकत घेणारे साकीनाका येथील शकील अहमद खान, त्रिभुवन विश्वकर्मा, भैय्यालाल विश्वकर्मा, पंचराम विश्वकर्मा व ट्रकचालक विनोद कश्यप या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.