व्यवस्थेशी लढणारे साहित्य लक्षणीय

साहित्याच्या विविध प्रकारांबाबत वेळोवेळी चर्चा झाली असली तरी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य लक्षणीय

खास प्रतिनिधी, यशवंतराव चव्हाण नगरी, (चिपळूण) | January 12, 2013 5:26 AM

साहित्याच्या विविध प्रकारांबाबत वेळोवेळी चर्चा झाली असली तरी प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य लक्षणीय ठरते, असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील पवनतलाव मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
या प्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. कोत्तापल्ले यांनी मराठी भाषा आणि साहित्याची निर्मिती व सातत्याने होत गेलेल्या स्थित्यंतरांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, कलावंताच्या अंतरीचे संकल्पना चित्र आणि भोवतीचे वास्तव यांच्या ताणातून कलाकृतीचा जन्म होत असतो. त्यातही असे लक्षात येते की, जगातील टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते. वास्तवाचे झडझडून भान देणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारे असते. प्रस्थापित संस्कृतीतील कुरूपता अधोरेखित करण्याचे कार्य हे साहित्य करत असते. त्याचप्रमाणे जीवनाचे खरेखुरे सौंदर्य कुठे आहे आणि कसे आहे, हेही ध्वनित करत असते. अशा प्रकारे प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारेच साहित्य नव्या उन्नत जीवनाची स्वप्नेही पाहते.
साहित्य संमेलनापूर्वी उद्भवलेल्या विविध वादांचा ओझरता उल्लेख डॉ.कोतापल्ले यांनी भाषणाच्या सुरुवातीला केला, पण त्याबाबत संमेलनाच्या समारोपप्रसंगी भाष्य करण्याचे सूतोवाच केले. चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांनी शहराच्या वतीने सर्वाचे स्वागत केले. पालकमंत्री भास्कर जाधव, खासदार अनंत गिते, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा जाधव इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.  नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी स्वागत केले. संजय भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले.
राजकारण्यांनी लिहिते व्हावे
राजकारणी लोकांना अनुभव दांडगा असतो. या अनुभवांना शब्दरूप देत राजकारणी लिहिते झाले तर चाकोरीतल्या साहित्यापेक्षा वेगळ्या साहित्याची निर्मिती होईल, असे विचार मावळते संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
राजकारणी लिहिते झाले तर शब्द वापरणे किती जोखमीचे आणि जबाबदारीचे असते, याची जाणीव त्यांना होईल असेही डहाके म्हणाले.
हुकूमशाहीचा अंकुरसुद्धा फुटू देता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यामध्ये विकासाची घोषणा होते. विकास झाला पाहिजे याविषयी दुमत असणार नाही. पण विकासाबरोबरच विस्थापितांचे आक्रंदनही ऐकू येते. या विस्थापितांसंबंधी जाणीव असावी. अशी संवेदनशीलता राजकारणामध्ये जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींमध्ये असावी. आपल्या मनातील गाणं दडपू नका. गोष्ट इतरांना सांगा. त्यासाठी लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करा, असे आवाहन डहाके यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्राचे चित्र
विदर्भातील संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके हे मराठवाडय़ामध्ये जन्माला आलेल्या डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करीत आहेत. त्यामुळे चिपळूण येथील साहित्य संमेलन हे संयुक्त महाराष्ट्र सुंदर चित्र आहे, अशी भावना स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. समतेचा विचार घेऊन नवी पिढी मोठय़ा संख्येने ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाली असेही त्यांनी सांगितले.
भाषण नव्हे, आक्षेपांना उत्तरे
साहित्य महामंडळ संमेलन घेण्याशिवाय नेमके करते काय, साहित्य महाकोशात किती रक्कम आजवर जमा झाली, संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर असलेली राजकीय नेत्यांची नावे अशा वेगवेगळ्या आक्षेपांना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी आपल्या भाषणातून उत्तरे दिली.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या कार्यावर आधारित त्याचप्रमाणे ‘राजकीय नेते काय वाचतात आणि का वाचतात’ असे दोन परिसंवाद असल्याने राजकीय व्यक्तींची नावे वाढल्याचे त्यांनी सांगितले.
तीन वर्षांच्या कार्यकाळात खूप काम करून शिकता आले असे सांगत उषा तांबे यांनी आता साहित्य महामंडळ कार्यालय पुण्याला जात असल्याचे सांगितले. विश्व साहित्य संमेलनाच्या आक्षेपांना त्यांनी उत्तर दिले.

First Published on January 12, 2013 5:26 am

Web Title: sahitya fighting against system is outstanding