शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टला गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल १४४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती संस्थानाचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी बुधवारी दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येकवर्षी ट्रस्टच्या उत्पन्नामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या उत्पन्नापैकी ८२८ कोटी रुपयांचा निधी हा भक्तांना विविध सोईसुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात आला. त्यामध्ये १६० कोटी रुपये रुग्णालय आणि प्रसादालय बांधण्यासाठी खर्च करण्यात आले तसेच विविध चॅरिटी ट्रस्टना देणगी म्हणूनही निधी देण्यात आल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
पाच वर्षांपूर्वी सुमारे २० हजार नागरिक दररोज साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत होते. हा आकडा आता ६० हजारांपर्यंत गेला असून, शनिवार आणि रविवारी तर एक लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थानाला सध्या दररोज ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, असेही मोरे म्हणाले.