कणकवली तालुक्यातील जानवली नदीत वरवडे संगमापासून १० किलोमीटर अंतरापर्यंत नौकानयन आणि साहसी जलक्रीडा प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. महाड-कोलाड येथील प्रकल्पाच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प आहे असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यातील पर्यटन हे एक मुख्य धोरण त्यांनी ठेवून पर्यटनातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे आमदार नितेश राणे म्हणाले. कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली. महाड-कोलाड येथे वीरेंद्र सावंत नौकानयन व साहसी जलक्रीडा प्रकल्प चालवत आहेत. त्या प्रकल्पाला भेट देऊन वीरेंद्र सावंत यांना वरवडे नदीचा सव्‍‌र्हे करण्यास सांगितला. त्यांनी सव्‍‌र्हे केल्यावर वरवडे नदीचा १० किलोमीटरचा प्रवाह नौकानयन व जलक्रीडासाठी योग्य असल्याचे सांगितल्यावर योग्य त्या परवानग्या घेण्यास सुरुवात केल्याचे आ. नितेश राणे म्हणाले.

जानवली नदीत वरवडे संगमापासून या नौकानयनाला सुरुवात होईल. एकाचवेळी १० ते १५ पर्यटक स्वत: विनायांत्रिकी नौका चालविण्याचा आनंद लुटतील. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. या यशस्वी प्रयोगानंतर टप्प्याटप्प्याने प्रकल्पाला पायाभूत सुविधा देण्यात येतील असे आ. नितेश राणे म्हणाले.

नौकाविहाराआधी पर्यटकांना सुरक्षिततेबाबत संपूर्ण माहिती प्रथम दिली जाईल. त्यानंतर पर्यटकांच्या नौकेसोबतच रेस्क्यू टीमची नौकाही असणार आहे. प्रत्येक पर्यटकाला विमा संरक्षण दिले जाईल. या प्रकल्पाची जगभर प्रसिद्धी व मार्केटिंग करून पर्यटकांना सिंधुदुर्गात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नदीला तीन ते चार महिने पाणी मिळेल अशा अंदाजाने हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे असे आमदार राणे म्हणाले. येत्या ५ सप्टेंबरपासून एक आठवडा  सर्व पर्यटकांना मोफत नौकाविहार आणि जलक्रीडांचा आनंद लुटता येईल. त्यानंतर प्रतिव्यक्ती १२०० रुपये फी आकारून प्रकल्प चालविला जाईल असे ते म्हणाले.