देशाच्या २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या धर्मनिहाय जाहीर झालेल्या आकडेवारीत २००१च्या जनगणनेच्या तुलनेत मुस्लीम लोकसंख्येत वाढ तर हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाल्यामुळे साधू-महंतांनी चिंता व्यक्त केल्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. या प्रश्नावर त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांसमवेत होणाऱ्या बैठकीत बंद दाराआड चर्चा करून तोडगा काढण्यात येईल आणि ६ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या संत साहित्य संमेलनात तो जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेत याआधीच्या जनगणनेच्या तुलनेत मुस्लीम लोकसंख्येत ०.८ इतकी वाढ तर हिंदूंच्या लोकसंख्येत ०.७ टक्के घट झाली. मुस्लीम व हिंदूंच्या लोकसंख्येतील या बदलत्या प्रवाहाविषयी विविध संप्रदायातील साधू-महंतांनी चिंता व्यक्त केली. यावर साधू-महंतांशी चर्चा करण्यात येईल. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा संकल्प विहिंपने केलेला आहे. हा संकल्प कधी पूर्णत्वास जाईल ते मात्र सांगता येणार नाही. इतिहास कधी घडेल हे सांगता येत नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली. गुजरातमध्ये आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या पटेल पाटीदार समाजाच्या आंदोलनामागे कोण आहे ते तेथील मुख्यमंत्री सांगू शकतील. तथापि, देशात पाच कोटी बेरोजगार युवक असून कोणत्याही पक्षाचे शासन असले तरी त्यांनी त्यात लक्ष घालायलाच हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील हिंदू समाजाला सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने संत साहित्य संमेलनात विशेष ठराव मांडला जाणार आहे.