लैंगिक अत्याचारांप्रकरणी आधी फाशी व नंतर जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराने पॅरोलवर सुटका होताच पुन्हा तसाच गुन्हा केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शिर्डीत उघडकीस आला आहे. सुनील साळवे असे या नराधमाचे नाव असून तो मूळचा नाशिक येथील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
शिर्डीतील कालिकानगर भागात भाडय़ाच्या खोलीत राहणाऱ्या सुनीलने त्याच्या शेजारच्याच नऊ वर्षांच्या मुलीचे २८ डिसेंबर रोजी अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी शिर्डी पोलिसांकडे दाखल केली. त्याचदरम्यान सुनीलही बेपत्ता झाला असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला.
तो शुक्रवारी मनमाडला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. मुलीचा मृतदेह शिर्डीच्या साईनगर रेल्वेस्थानकानजीकच्या काटवनात टाकल्याची माहितीही त्याने दिली. अत्यंत कुजकट अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुनीलला अपहरण, अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या आदी गुन्ह्य़ांखाली अटक केली आहे.
फाशी.. जन्मठेप.. पॅरोल..आणि..?
सुनील साळवे याला लैंगिक अत्याचारांच्या तीन प्रकरणांत याआधी फाशीची शिक्षा झाली होती असे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या गुन्ह्य़ांमध्ये जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षाही सुनावली. मात्र, उच्च न्यायालयात ही शिक्षा रद्द होऊन सुनीलला जन्मठेप ठोठावण्यात आली. ही शिक्षा भोगत असताना त्याची पॅरोलवर सुटका झाली. त्यानंतर तो फरार झाला होता.