केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘कंम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याच्या संपन्न संजय कोल्हटकर या मराठी तरुणाने देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा फडकाविला आहे. देशभरातील एक लाख ३३ हजार उमेदवारांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये ही लेखी परीक्षा दिली होती. त्यात ८,५०० उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यामधून काही निवडक उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ २०५ जणांची भारतीय लष्करी प्रबोधिनीसाठी (इंडियन मिलिटरी अकॅडमी) निवड झाली आहे.
संपन्नसह निवड झालेल्या सर्व उमेदवारांना डेहराडून येथील भारतीय लष्करी प्रबोधिनीत दीड वर्षांचे लष्करी प्रशिक्षण घ्यावे लागेल. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय सैन्यदलात ‘लेफ्टनंट’ रँक मिळेल आणि ते ‘कमिशन्ड ऑफिसर्स’ म्हणून कार्यरत होतील. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निकाल जाहीर केला. त्यात पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या २३ वर्षीय संपन्नचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत प्रथम स्थानावर झळकले.
‘संपन्न’ कारकीर्द
टिळक रोडवरील डी. ई. एस. स्कूलमध्ये शालेय शिक्षण. दहावीत ८८ टक्के गुणे. अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण एस. पी. महाविद्यालयातून. बारावीत ७५ टक्के गुण. पीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रिटिंग अ‍ॅण्ड ग्राफिकल टेक्नॉलॉजीची पदवी. आवड – ट्रेकिंग, प्रवास, वाचन, व्यायाम आणि हिप हॉप नृत्य. आयआयटी पवईच्या ‘मूड-इंडिगो’ स्पर्धेत त्याच्या हिप हॉप टीमला प्रथम क्रमांक. ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्येही त्याची टीम उपांत्यपूर्व फेरीपर्यंत. वडील इलेक्ट्रिकल सल्लागार. आई कल्पना या गृहिणी.         

देशात पहिला येण्याचा बहुमान मिळाल्याने आपणास खरोखरच सुखद धक्का बसला आहे. या यशाचे श्रेय कुटुंबीय आणि परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर व त्यांच्या ‘अ‍ॅपेक्स करिअर्स टीम’चे आहे.
संपन्न कोल्हटकर