वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे आश्वासन अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दिल्यानंतर अलिबागच्या खारेपाटातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण सोमवारी रात्री अखेर मागे घेतले. आमदार पंडित पाटील व अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते सरबत घेऊन ग्रामस्थांनी आपले उपोषण सोडले .

अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीत बेकायदा संक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपशामुळे शासनाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर वाळू उपशामुळे खाडीलगतच्या कुसुंबळे, काचळी, पिटकिरी, हेमनगर, कोपरी, कुर्डुस येथील शेतजमिनीची मोठय़ा प्रमाणावर धूप होऊन ती नापीक झाली आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थांनी सातबाराधारक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. सोमवारी सायंकाळी अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. या भागात हातपाटीने वाळू उपसा करण्याचा परवाना देण्यात आला आहे. परंतु परवानगीतील अटी, शर्तीचा भंग करून वाळू उपसा होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याचे तहसीलदार संकपाळ यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलकांचे समाधान झाले. आमदार पंडित पाटील व नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आंदोलकांना सरबत देऊन उपोषणाची सांगता केली.